ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काल (गुरूवारी) रात्री आठच्या सुमारास राळेगणसिद्घीत परतले. दि. ३ डिसेंबर रोजी ते दिल्लीस गेले होते.
परतल्यानंतर हजारे यांनी प्रशिक्षण केंद्रातील खोलीत विश्रांती घेतली. आज सकाळी प्रशिक्षण केंद्राच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. दुपारी भुवनेश्वर, ओरिसा येथून आलेल्या विद्यार्थ्यांंनी हजारे यांची भेट घेण्याची इच्छा प्रकट केल्यानंतर तब्येत ठिक नसतानाही हजारे यांनी या विद्यार्थ्यांंशी सुमारे एक तास संवाद साधला.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी गावागावांत प्रबोधन करण्याचे आवाहन करून जनलोकपालच्या विधेयकास विरोध करणाऱ्या खासदारांचा पराभव झाला पाहिजे, असे हजारे म्हणाले. सत्तेतून पैसा व पैशांतून पुन्हा सत्ता हेच जणू आजच्या राजकारणाचे सुत्र बनले असून भ्रष्ट गुंड लोक संसदेच्या पवित्र मंदिरात जात आहेत. अशा लोकांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा कशी ठेवणार; सक्षम जनलोकपालच्या निमित्ताने देशभर जनजागृती झाली असून देशातील मतदार जागृत झाला आहे. त्यामुळे  युवा पिढीने आता परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.