निवेदकाला बहुरूपी, बहुश्रृत भूमिका करावी लागते. यासाठी साधनाही तेवढीच आवश्यक आहे. मनोरंजनाचे क्षेत्र सध्या वेगाने वाढत आहे. निवेदन हे असेच एक क्षेत्र असून चांगला आवाज, नेमकेपणाने योग्य तेच बोलण्याचे कौशल्य असेल आणि काय नाही बोलायचे हे समजले तरी चांगला निवेदक होण्यास हरकत नाही, असे मत प्रख्यात रेडिओ जॉकी भूषण मटकरी यांनी व्यक्त केले.
‘इंडिया रेडिओ फोरम’तर्फे देण्यात येणारा ‘इंडियन एक्सलन्स इन रेडिओ अ‍ॅवॉर्डस’ हा रेडिओ क्षेत्रातील मराठी भाषेचा सवरेत्कृष्ट रेडिओ जॉकीचा पुरस्कार येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या भूषण मटकरी यांना मिळाल्याने विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात मटकरी यांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन हा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना मटकरी यांनी या क्षेत्राविषयी माहिती दिली.
वर्षभरातील कार्याचा आढावा घेऊन हा पुरस्कार दिला जातो. हिंदीसह मराठी, तेलगू, तामीळ, मल्याळम, गुजराथी, बंगाली कन्नड आदी भाषांतील रेडिओ जॉकींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. उत्तम निवेदक कसा असायला हवा याविषयी बोलताना मटकरी यांनी कोणताही कार्यक्रम आणि प्रेक्षक यांना जोडणारा दुवा म्हणजे निवेदक, असे सांगितले. कार्यक्रम सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत पुढे पुढे नेण्याचे आणि त्यात रंगत आणण्याचे काम निवेदक करतो. या क्षेत्रात यायचे असेल तर पहिली अट हीच की आवाज चांगला हवा. भाषेवर प्रभुत्व, हजरजबाबीपणा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, उत्तम संवाद कौशल्य या गोष्टी आपल्यात हव्यात. ज्या गोष्टी नसतील त्या आत्मसात कराव्यात. हे जमून आल्यास निवेदनाकडे करिअर म्हणून पाहता येईल. निवेदन ही एक कला आहे. ही कला जोपासण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यासाची गरज आहे. कुटुंबात संवाद साधण्याचे प्रभावी काम खासगी रेडिओ माध्यमे वेगाने करताहेत हे मटकरींनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले.
‘गुड मॉर्निग नाशिक’ कार्यक्रमातून विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे काम झाले असून हा संवाद पुढील काळात अधिक वृिद्धगत होईल, असा विश्वास कुलसचिव डॉ. अतकरे यांनी व्यक्त केला.
श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.