पुणे विभाग ग्रंथालय संघ व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन येत्या २० जानेवारी रोजी सोलापुरात किल्लेदार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास रणदिवे व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जयंत आराध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील कुमठा नाका परिसरातील नवनाथ सार्वजनिक वाचनालयाने या वार्षिक अधिवेशनाचे यजमानपद स्वीकारले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनास सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महापौर अलका राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय आमदार दीपक साळुंखे, आमदार विजय देशमुख, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सिध्दाराम म्हेत्रे, राज्याचे ग्रंथालय संचालक डॉ. बा. ए. सनान्से, सहायक ग्रंथालय संचालक ध. बा. वळवी, साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले, जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल वंदना देशमुख, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या अधिवेशनात शासनाच्या वतीने दिला जाणारा डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हरिदास रणदिवे यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पुणे विभागीय ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्रंथप्रेमी विजयसिंह मोहिते-पाटील विभागस्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार, साहित्य पुरस्कार व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार व साहित्य पुरस्कार तसेच ब.ना.  केसकर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार व विश्वनाथ नादरगी आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे जयंत आराध्ये यांनी सांगितले. या अधिवेशनात ग्रंथालय अनुदानवाढीसह सेवकांसाठी सेवानियम आदी प्रश्नांवर चर्चा होऊन ठराव पारित केले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेस कुंडलिक मोरे, देविदास मेढे, विश्वनाथ निरंजन, वृषाली हजारे आदी उपस्थित होते.