गोवंश हत्याबंदी घालण्यावरून निर्माण झालेले वादळ शमत नाही तोच पोलिसांनी बंदी निर्णयाची भीती दाखवून सामान्य शेतकऱ्यांना लुटणे सुरू केले आहे.
युती सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्यावर उलटसुलट मते व्यक्त करण्यात येत आहेत. बंदीचा परिणाम, दुष्परिणांबद्दल चर्चा घडून येत आहेत. याशिवाय, भाकड गायींचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या निर्णयामुळे वर्षांनुवष्रे चालणाऱ्या बैलबाजारांवर कुऱ्हाड कोसळणार, ही शेतकऱ्यांच्या मनातील भीती चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका शेतकऱ्याला आलेल्या अनुभवाने खरी ठरली आहे. युती सरकार बैलबाजार या संकल्पनेला संपुष्टात आणण्याच्या संदर्भात विचारच करत आहे, पण पोलिसांनी मात्र केव्हाच या निर्णयाची अंमलबजावणी तत्परतेने सुरूही केली आहे.
साधारणपणे एखाद्या वाहनातून सामान नेताना नाक्यावर त्यांना अडवणे हे एकवेळ मान्य, पण बैलगाडीतून बैल नेणाऱ्या शेतकऱ्याला अडवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचे पोलिसांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याअंतर्गत घडलेल्या या प्रकाराने सर्वानाच चकीत केले आहे. सावली तालुक्यातील सायखेडा येथील ईश्वर गणपत मुळे गेल्या रविवारी गोंडपिपरी येथील बैलबाजारात दोन गोऱ्हे आणि दोन बैल विकण्यासाठी नेत होते. सायखेडा ते गोंडपिपरी हे अंतर बरेच लांब असल्याने त्यांना बैलबंडीतून नेले जात होते. त्याचवेळी पाथरी पोलिस ठाण्यातील एका शिपायाने त्यांना अडवले आणि कायद्याचा धाक दाखवून रकमेची मागणी केली. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याला खरेच असा कायदा आहे किंवा नाही, हे काहीही ठाऊक नव्हते, पण खाकी वर्दीतील शिपाई सांगतो आहे म्हणजे खरेच आहे, असे समजून शेतकऱ्याने २०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, गोवंश हत्याबंदीचा कायदा न लावता वाहनातून बैल वाहून नेणारे कलम लावून १०० रुपयांचे चालान भरण्यास शिपायाने सांगितले. हा फक्त एका सावली तालुक्यातला प्रकार झाला, पण असे प्रकार आता गरीब व कायद्याची जाण नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे कायदा झालेला नसला तरीही शेतकरी बैलबाजारात बैल विकून थोडाही पैसा कमावू शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतके गोऱ्हे करू काय?
यासंदर्भात या शेतकऱ्याने दिलेली प्रतिक्रिया बोलकी आणि सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आमच्याकडे दोन-तीन गाई असल्याने दरवर्षी गोऱ्हे होतात आणि इतके गोऱ्हे ठेवून काय करणार म्हणून ते विकायला काढले जातात, कारण प्रश्न चाऱ्यांचा आहे. शिवाय, शंकरपटावर बंदी आहे. बैल विकल्यास आम्हालाही पैसे मिळतील आणि इतरांना शेतीच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल, असे हा शेतकरी म्हणाला.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti cow slaughter bill in maharashtra
First published on: 18-03-2015 at 08:28 IST