सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी सामाजिक उन्नतीचे काम करताना छत्रपती राजे संभाजी यांचा आदर्श समोर ठेवावा. राजे संभाजी यांची आपले विचार व कार्यपद्धती याबद्दल जी एकनिष्ठा होती त्याप्रमाणे एकनिष्ठा अंगीकारल्यास समाज उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन बहुजन स्वराज महासंघाचे अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी केले.
येथे राजे संभाजी जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम करताना सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून तोच आदर व बहुमान दिला पाहिजे, तोच नेमका मिळत नाही. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जाणवत नाही.
विरोध किती व कसा होतो यापेक्षा कार्यकर्त्यांची एकाग्रता, एकनिष्ठता यावर कार्याचे यश-अपयश अवलंबून आहे असेही ते म्हणाले.
शहर अध्यक्ष सुभाष चव्हाण, प्रदेश सरचिटणीस रफिक शेख आदी या वेळी उपस्थित होते.