छत्तीसगढ येथील पारंपरिक धातुकाम तसेच राजस्थान येथील ‘टेराकोटा’ शिल्प कला यांचे प्रदर्शन येथील क. का. वाघ ललितकला महाविद्यालयाच्या शिल्पकला विभागाच्यावतीने ७ ते १० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शिल्पकार अरुणा गर्गे यांच्या हस्ते होणार आहे.
गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या दालनात हे प्रदर्शन होईल. भारतीय संस्कृ तीला कलेचे वरदान लाभले आहे. विविध संस्कृतीच्या संगमातून कलांचे अनेक आविष्कार पहावयास मिळतात. या कलांची ओझरती ओळख जनमानसात करून देण्यासाठी ललितकला महाविद्यालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांंनी छत्तीसगढ व राजस्थान येथील विविध भागांना भेटी दिल्या. तेथील कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. छत्तीसगढ परिसरात त्याकरिता १५ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. देशातील अतिशय प्राचीन कलांपैकी एक म्हणजे ‘डोकरा आर्ट’. ही पारंपरिक धातुशिल्प पध्दत आहे. त्यात पूर्णत: नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यातील कोंडागाव येथील वनवासींनी ही कला जोपासली आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून पारंपरिक पध्दतीचा वापर करून आधुनिक, सृजनात्मक अशा ४५ शिल्पांची निर्मिती केली आहे.
सिंधु संस्कृतीशी नाते सांगणारी मातीची भांडी, नाणी, खेळणी, दागिने अशा विविध गोष्टींसाठी मातीचा वापर केला जातो. या प्राचीन व भारतीय कला परंपरेला ओळख करून देणारी टेराकोटा शिल्प पध्दती. राजस्थान येथे मोलेला, राजसमंद येथील काही गावांमध्ये टेराकोटा शिल्पकला आजही टिकून आहे. कलेची जवळून ओळख व्हावी, यासाठी स्थानिक कलावंताच्या सहकार्याने १५ दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली.
त्यात ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ८० कलाकृती तयार केल्या. पारंपरिक कलांना उत्तेजन देणे तसेच या पारंपरिक कलांचे तंत्र वापरून आधुनिक कलानिर्मिती करणे हा या यामागील मुख्य हेतु असल्याचे शिल्पकला विभागाचे प्रा. योगेश गटकळ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या सर्व कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहणार असून कलाप्रेमींनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.