जिल्हाधिकारी डॉ. संजीकुमार यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे रायफल व पिस्तूल असे दोन्ही शस्त्र परवाने निलंबीत करण्याचा आदेश आज दिला. कर्डिले यांचे माजी स्वीय सहायक व सध्याचे विरोधक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली होती.
कर्डिले यांच्याकडून आपल्या जिवितास धोका आहे, असे जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. तसेच कर्डिले यांच्यावर भिंगार व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यातील भिंगारमधील गुन्ह्य़ात त्यांनी डॉ. कांकरिया यांना डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याची तक्रार आहे, तर कोतवाली ठाण्यातील कर्डिले यांच्यावर दाखल गुन्हा खून प्रकरणातील मयताच्या नातेवाईकास पैसे देऊन फितवल्याचा आहे. या गुन्ह्य़ात आपण महत्वाचे साक्षीदार असल्याने त्यांच्याकडून जिवितास धोका आहे, असे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानंतर पोलीस अधीक्षकांमार्फत कर्डिले यांच्यावर दाखल सर्व गुन्ह्य़ांची चौकशी केली.
त्यानंतर त्यांनी जाधव यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचा निष्कर्ष काढून आमदार कर्डिले यांचे शस्त्र परवाने दोन्ही गुन्ह्य़ांचा न्यायालयात निकाल लागेपर्यंत निलंबीत करत असल्याचा आदेश दिला. कर्डिले यांनी त्यांच्या नावे असलेले दोन्ही परवाने संबंधित पोलीस ठाण्यात जमा करायचे आहेत.