एक काळ असा होता की हॉलीवूडमध्ये अॅक्शपटांची जास्त चलती होती आणि त्या काळात सिल्व्हेस्टर स्टॅलोन आणि अरनॉल्ड श्वात्र्झनेगर हे दोघेही हॉलीवूडचे सर्वात लोकप्रिय अॅक्शन हीरो होते. त्यामुळे कारकिर्दीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर दोघांमध्येही मैत्रीपेक्षा व्यावसायिक स्पर्धा आणि चुरस जास्त होती. काळ बदलत गेला तसे हे अॅक्शन हीरो हळूहळू चरित्र नायक म्हणून नावारूपाला आले अर्थात, आपल्या आधीच्या लौकिकाला साजेल असेच चित्रपट करत त्यांची वाटचाल झाली. दरम्यानच्या काळात सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाचे धडेही गिरवले आणि त्याच्याच दिग्दर्शनातून उतरलेल्या ‘द एक्सपान्डिबल्स’च्या निमित्ताने सिल्व्हेस्टर, अॅर्नोल्ड, ब्रूस विलिस अशी हॉलीवूडची नामी मंडळी एकत्र आली. पण, तेव्हाही अरनॉल्ड पाहुण्या भूमिकेत असल्याने सिल्वेस्टरशी त्याची जोडी जमून आली नव्हती. मायकेल हॅफ्स्टॉर्म दिग्दर्शित ‘एस्केप प्लॅन’ या नव्या हॉलीवूडपटात हे दोन दिग्गज अभिनेते एकत्र काम करणार आहेत. त्यानिमित्ताने सिल्व्हेस्टर स्टॅलोनने प्रसिद्धी माध्यमांकडे या चित्रपटाविषयी, अरनॉल्डविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या..
‘एस्केप प्लॅन’चे पोस्टर्स पाहिल्यानंतर पहिल्या प्रथम विचार येतो तो या अॅक्शन हीरो जोडगोळीचा.. गेली कित्येक दशके अरनॉल्ड आणि तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून वावरलात. मग इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करतानाचा अनुभव कसा होता, या प्रश्नावर प्रेक्षकांच्या अफ लातून मागणीमुळेच असा काहीतरी वेगळा विचार चित्रपटकर्मी करायला लागलेत, असे उत्तर सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांनी दिले. सध्याचे प्रेक्षक हे खूप बुद्धिमान आणि आग्रही मतांचे आहेत. या बुद्धिजीवी वर्गाला चित्रपटांकडून वेगळे काही हवे असते. त्यांना ठरावीक ठोकताळ्यांनुसार बनवलेले पूर्वीचे चित्रपट आवडत नाहीत. त्यामुळे अरनॉल्ड आणि मी एकाच चित्रपटातून दिसलो तर काहीतरी वेगळे पाहायला मिळेल ही त्यांची अपेक्षा आहे. ‘एस्केप प्लॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार असली तरी चित्रपटात आमच्याकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा भन्नाट काहीतरी त्यांना पाहायला मिळेल. दुसरं म्हणजे आता एकत्र काम करतानाचा अनुभव विचाराल तर पुन्हा एकदा आम्ही आमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षकांना काय देऊ शकतो याच्यावरच आमचा भर आहे जो पूर्वीही तसाच होता. ज्याला मी अॅक्शनपटांचा सुवर्णकाळ म्हणतो त्या काळात आमच्या दोघांची कारकीर्दही समांतररित्या घडत गेली. आमच्यातील व्यावसायिक स्पर्धा ही आम्हाला आमच्यातले उत्कृष्टत्व सिद्ध करायला भाग पाडत होती त्यामुळेच तर तुम्हाला आमचे चित्रपट आवडत होते, असे स्टॅलोन यांचे म्हणणे आहे. ‘एस्केप प्लॅन’ हाही अॅक्शनपट आहे पण, इथे नुसती अॅक्शन दाखवून आमची सुटका नाही. इथे नुसती बॉम्बगोळे, बंदुकांच्या फैरी झाडणारे नायक असा मामला नाही. या चित्रपटात आम्हाला आमची सुटका करण्यासाठी खरोखरच डोक्याने विचार करायला लागतो. जे आजवर तुम्ही आमच्या चित्रपटात फार कमी वेळा पाहिले असेल. त्यामुळे या चित्रपटात आम्ही दोघे वेगळ्या अर्थाने एकत्र आलो आहोत, हेही तितके च खरे आहे, अशा शब्दांत आपल्या जोडीला या चित्रपटात प्लॅन केल्यामुळे ‘एस्केप प्लॅन’ कसा रंगलाय हेही स्टॅलोनने सांगितले. कोणीही सुटू शकणार नाही अशा भल्या मोठया तुरुंगात अडकलेले दोन कैदी तिथून पळून जाण्याचा प्लॅन कसा काय यशस्वी करतात, याची कथा या चित्रपटात आहे. रे बर्सलिन हा त्या दोघांमधला एक कैदी ज्याची भूमिका सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी रंगवली आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना रे हा अगदी धूर्त माणूस आहे. छोटी-छोटी निरीक्षणं जी इतरांच्या दृष्टीने अगदीच अर्थहीन असतात त्यांचा वापर करून रे आपल्या योजना अमलात आणत असतो. म्हणजे कुठला पहारेकरी किती वेळात किती पाऊले चालतो? तो हातावरचे घडय़ाळ किती वेळा बघतो, अशा बारीकसारीक गोष्टीं रेला तोंडपाठ होतात. पण, तो ज्या तुरुंगात अडकला आहे ते त्याच्या या सूक्ष्म निरीक्षण बुद्धीलाही आव्हान देणारा आहे. त्यामुळेच तर रॉटमेयर (अरनॉल्ड)च्या साथीने त्याला ‘एस्केप प्लॅन’ बनवावा लागतो, अशी कथा स्टॅलोन सांगतात. हॉलीवूडपटांची शैली काळाबरोबर वेगाने बदलत गेली आहे. गेली कित्येक वर्षे काम करत असल्याने मी इतक्या पटकथा वाचल्या आहेत की तीस पानं वाचून झाल्यावर चित्रपटाची कथा काय वळण घेणार आणि कुठे संपणार हे मला कळून चुकते. पण, ‘एस्केप प्लॅन’ची पटकथा याला अपवाद होती. आजच्या प्रेक्षकांना विचार करायला लावेल असे चित्रपट देणे, अशी पटकथा लिहिणे ही आजच्या काळाची गरज आहे. ‘एस्केप प्लॅन’मध्ये प्रेक्षकांना तो धक्का देण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच हा प्लॅन आपण निवडल्याचेही स्टॅलोन यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2013 रोजी प्रकाशित
अरनॉल्ड आणि सिल्व्हेस्टर स्टॅलोनचा एस्केप प्लॅन
एक काळ असा होता की हॉलीवूडमध्ये अॅक्शपटांची जास्त चलती होती आणि त्या काळात सिल्व्हेस्टर स्टॅलोन आणि अरनॉल्ड श्वात्र्झनेगर

First published on: 20-10-2013 at 08:21 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arnold and sylvester stallones escape plan