वाढती महागाई, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक सुरक्षा हक्क, योग्य किमान वेतनाची शाश्वती, सर्व स्तरावरील कंत्राटीकरण, कामगार कायद्यांचे उल्लंघन आणि कामगार संघटनांच्या हक्कांवरील हल्ले या कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारची कमालीची उदासीनता दिसत असून त्याकडे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २ डिसेंबर रोजी सोलापुरात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने ‘जागर’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवछत्रपती रंगभवनात सकाळी दहा  वाजता सिटूचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या ‘जागर’ परिषदेत विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केरकर, अ. भा. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अनंत चव्हाण, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सह सरचिटणीस एस. के. बोस व भारतीय मजदूर संघाचे प्रकाश आळंदकर आदी मंडळी सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती जागर परिषदेचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महागाई नियंत्रणात येण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, रोजगार वाढीसाठी ठोस उपाय अमलात आणावेत, कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, संघटित व असंघटित कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी व राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा निधीची निर्मिती करावी, केंद्र व राज्य सरकारतर्फे सार्वजनिक कंपन्यांचे निर्गुतवणुकीकरण थांबवावे, कायमस्वरूपी आणि नियमित कामांचे कंत्राटीकरण करू नये, महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा परीक्षा अधिनियम त्वरित रद्द करावे आदी विविध अकरा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही जागर परिषद होत असल्याचे इंदापुरे यांनी सांगितले.
या जागर परिषदेत सिटूसह भारतीय मजदूर संघ, इंटक, आयटक, महाराष्ट्र कामगार सेना, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, सीआरएमएस, राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना कृती समिती, ऑल इंडिया एन्शुरन्स एम्प्लॉयमेंट असोसिएशन, सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समिती, राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती, बीएसएनएल कर्मचारी संघ, अंगणवाडी कर्मचारी संघ, सोलापूर जिल्हा श्रमिक संघ, सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना, एमएसई वर्कर्स फेडरेशन, कास्ट्राईब कर्मचारी संघटना आदींचा सहभाग राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.