सातबारा उताऱ्यात नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पारशिवनीचा एक मंडळ अधिकारी व पटवाऱ्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पकडले.
गुरुतेगबहाद्दूर नगरात राहणारे सुरेश नीळकंठ केकतपुरे यांची पत्नी लताने पारशिवनी तालुक्यातील रंगारी रिठी येथील ०.९६ हेक्टर आर शेती खरेदी केली. सातबारा उताऱ्यात नावाची नोंद घेण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला. त्यांच्या नावाची नोंद घेण्यासाठी भगवान मेश्राम (रा. पालोरा) यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी तहसीलदारांकडे सोपविण्यात आले. चौकशीअंती तहसीलदारांनी लता सुरेश केकतपुरे यांची सातबारामध्ये नोंद करण्याचा २३ जानेवारीला आदेश दिला. त्यानुसार पटवाऱ्याने नोंद केली. त्यास अधिकृत मान्यता देण्यासाठी नवेगाव सर्कलचे मंडळ अधिकारी (रेव्हेन्यू इन्स्पेक्टर) कृष्णराव बाजीराव कांबळे यांच्यापुढे स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले. त्यासाठी कांबळे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार सुरेश केकतपुरे यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक निशीथ मिश्र यांच्याकडे केली.  निशीथ मिश्र यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा रचण्याचे आदेश दिले. भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पारशिवनीच्या तहसीलदार कार्यालयात सापळा रचला.
 सुरेश केकतपुरे यांनी मंडळ अधिकारी कृष्णराव कांबळे यांची भेट घेतली. त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी करून ती पटवारी संजय विठोबा भोसले यांच्याजवळ देण्यास सांगितले. कार्यालय परिसरात केकतपुरे यांनी भोसलेची भेट घेतली. कृष्णराव कांबळे यांनी पाच हजार रुपये देण्यास सांगितले असल्याचे भोसले केकतपुरे यांना म्हणाला. भोसले याने पाच हजार रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने त्याला तसेच आरोपी कांबळे या दोघांना पकडले.