जिल्ह्य़ात सरत्या वर्षांत हुंडाबळी व बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे, तसेच जिल्ह्य़ातील आदिवासी व मागासलेल्या दरुगम भागात तर कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून येथील मुलींचे परप्रांतातील मुलांशी लग्न करून देण्याचे आमीष दाखवून त्यांची परस्पर विक्री केली जात असल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गेल्या कित्येक वर्षांंपासून एक रॅकेट सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराची १७६ प्रकरणे घडली आहेत. या घटनांमुळे पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला कक्ष स्थापन केले तरीदेखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. भावनिक आवाहनातून तरुणींचे लंगिक शोषण केले जात असल्याच्या घटनाही घडत आहेत. यापकी काही प्रकरणात तर जवळच्या नात्यातील व्यक्तीकडूनच महिलांचे शोषण केले जात आहे. त्यामुळे घरातही महिला कितपत सुरक्षित आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात सरत्या वर्षांत महिला अत्याचाराचे १७६ गुन्हे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक हुंडाबळीचे ३८ गुन्हे व बलात्काराची ३३ प्रकरणे आहेत. कौटुंबिक िहसाचारातून महिला दुर्बल होताना दिसत आहेत. दुसरीकडे महिला सबलीकरणासाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोगही होत आहे. जिल्ह्य़ातील १६ पोलीस ठाण्यार्तगत विनयभंगाच्या ४४ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली. विविध आमिषे दाखवून महिलांना पळवून नेण्याचे ८ गुन्हे दाखल करण्यात आले. महिलांशी लज्जास्पद वर्तवणूक करण्याचे १८ गुन्हे, तर हुंडय़ासाठी लग्न मोडणाऱ्यांचे ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हुंडाबंदीसाठी शासनाने कडक कायदा केला असला तरी सर्वाधिक महिलांवरील अत्याचार हुंडय़ापायी होत असल्याची बाब पोलिसात दिलेल्या तक्रारींच्या आकडेवारीवरून दिसून येते.
अल्पवयीन मुलींची परप्रांतात विक्री करणारे दलाल जिल्ह्य़ात सक्रिय आहेत. अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष देऊन त्यांना शहरात पळवून नेणे, त्यांचे लंगिक शोषण करून नंतर वाऱ्यावर सोडले जात आहे. मुलीच्या वडिलांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्या मुलींना परप्रांतात विकण्याचा गोरखधंदा जिल्ह्य़ात सुरू आहे. लग्न लावून देण्याच्या नावावर त्या मुलींना हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये विकण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी महिला तक्रार निवारण व समुपदेशन केंद्र व आता प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहेत. सोबतच गोंदिया, तिरोडा, देवरी व अर्जुनी-मोरगाव येथे एकूण चार सामाजिक संघटना कार्यरत आहेत.
महिलांना अजूनही दुय्यम वागणूक दिली जाते. अजूनही महिलांच्या बाबतीत भेदभाव केला जातो. त्यामुळे महिला दुबळ्या असल्याचा संदेश जातो. हा प्रकार थांबविण्याची गरज आहे. या घटना थांबविण्यासाठी कठोर कायद्यासोबतच समाजाच्या मानसिकतेत बदल करणे आवश्यक असल्याचे भारतीय महिला फेडरेशन गोंदिया शाखा सचिव करुणा गणवीर यांनी सांगितले. २६ महिला शिपायांची नियुक्ती महिलांच्या तक्रार निवारणाकरिता जिल्ह्य़ातील १६ पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराच्या तक्रारी त्वरित निपटण्यासाठी २६ महिला शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांवर अत्याचारासंदर्भात येणाऱ्या तक्रारींचा तपास लवकरात लवकर करावा व आरोपींवर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सांगितले.