सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक अशोक राणे यांनी सत्यजित राय यांच्या ‘अपू चित्रत्रयी’मधील अपू या व्यक्तिरेखेवर आधारित ‘बीइंग विथ अपू’ हा माहितीपट दिग्दर्शित केला असून त्याची निवड केरळ आंतरराष्ट्रीय माहितीपट व लघुपट महोत्सव आणि जर्मनीतील स्टुटगार्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशा दोन महोत्सवांमध्ये करण्यात आली आहे. एखाद्या चित्रपटातील व्यक्तिरेखेवरचा हा अशा प्रकारचा पहिलाच माहितीपट असावा. सत्यजित राय यांच्या ‘अपू चित्रत्रयी’मध्ये ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ असे तीन चित्रपट गणले जातात. ‘अशोक राणे प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या या माहितीपटाची संकल्पना, संशोधन, पटकथा, दिग्दर्शन अशोक राणे यांचे असून सहपटकथालेखन ज्येष्ठ पत्रकार रेखा देशपांडे यांचे आहे. आपल्या माहितीपटाचे वैशिष्टय़ सांगताना राणे म्हणाले की, १९५२ साली सत्यजित राय यांनी कोलकात्याजवळच्या बोडोल या गावातील ज्या घरात व परिसरात चित्रीकरण केले तेथेच ‘पाथेर पांचाली’तील छोटय़ा अपूची भूमिका करणारे आणि आता ६७ वर्षांचे असलेले सुबीर बॅनर्जी यांना घेऊन ‘बीइंग विथ अपू’चे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘अपूर संसार’मध्ये अपूची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता सौमित्र चटर्जी ‘अपू’विषयी बोलताना माहितीपटामध्ये पाहायला मिळतील. अपू ही व्यक्तिरेखा आपली सहप्रवासी कशी आहे याबाबत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, बुद्धदेव दासगुप्ता, डॉ. श्यामला वनारसे, जगन्नाथ गुहा, समीक बंदोपाध्याय, शेखर दास, रोश्मिला भट्टाचार्य आदी दिग्गजांनी माहितीपटात सांगितले आहे.