दाजीपूर येथे ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. रूपेश पेडणेकर (वय २१, रा.फोंडा घाट)व हृषीकेश परब (वय २१ रा.श्रावण, ता.मालवण) अशी अपघातात ठार झालेल्यांची नांवे आहेत. लक्ष्मण पारावे (वय २१ सध्या रा.मुंबई) असे जखमीचे नांव असून त्याला सिंधुदुर्ग येथील खाजगी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी राधानगरी पोलिसात घटनेची नोंद झाली असून ट्रकचालक महालिंग आप्पा पारा (रा.शहाबाद, जि.गुलबर्गा) याला ताब्यात घेतले आहे.
फोंडा येथील कृषी महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी दाजीपूर येथे पिकनिकसाठी आले होते. दुचाकीवरून आलेले हे विद्यार्थी शनिवारी दिवसभर या परिसरात फिरत होते. उगवाई देवीचे दर्शन घेवून ते फोंडय़ाकडे परत जात होते. राधानगरी-दाजीपूर रस्त्यावर दाजीपूर हायस्कूलजवळ वळणापासून महाविद्यालयीन विद्यार्थी जात होते. त्याचवेळी विरूध्द दिशेने फरशीने भरलेला ट्रक (के.ए.३२-डी.१४२६) येत होता. ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की पेडणेकर व परब हे दोघे जागीच ठार झाले. पारावे हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी राधानगरीचे पोलीस निरीक्षक डी.एस.घुगरे व सहकारी दाखल झाले होते. त्यांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले.