‘सारेगमप’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’नंतर ‘झी टीव्ही’ पाच ते बारा या वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ अभिनय संबंधित ‘रिअ‍ॅलिटी शो’ सुरू करीत आहे. या शोसाठी उद्या, १० जानेवारीला सकाळी ८ वाजता धनवटे नॅशनल महाविद्यालयात ऑडिशन घेण्यात येणार आहे. ‘मिसेस कौशिक की पाच बहुएं’ या मालिकेतील गुडियाची भूमिका करणारी बालकलावंत रोशनी पारेख आज नागपूरमध्ये आली असता या कार्यक्रमाची घोषणा केली.
‘झी टीव्ही’ने यापूर्वी ‘सारेगमप’ किंवा ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलावंत समोर आणले आहे. अभिनय या विषयावर फार कमी रिअ‍ॅलिटी शो झाले असल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना संधी देण्यात येणार आहे. आतापर्यंत १४ शहरात ऑडिशन्स घेण्यात आल्या असून नागपूर, मुंबई आणि पुण्याला त्या घेण्यात येणार आहेत. ज्यांना अभिनय क्षेत्रात आवड आहे असे मुले-मुली या ऑडिशनमध्ये सहभागी होऊ शकतात. या ऑडिशनच्या माध्यमातून देशभरातील सर्वोत्तम १८ खटय़ाळ मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला किमान दोन ते तीन मिनिट एखादा अभिनय सादर करावा लागेल. यात नक्कल, पपेट्री इत्यादी प्रकार सादर करता येईल. ‘मिसेस कौशिक की पाच बहूएं’ या मालिकेत काम करताना वेगळा अनुभव मिळाला. सर्व मोठी कलावंत असल्यामुळे मला सांभाळून घेण्यात आले. मालिकेमध्ये काम करण्यापूर्वी अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. जाहिरातीपेक्षा मालिकांमध्ये काम करण्याचा वेगळा आनंद असतो. मालिकांमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात. मालिकांचे चित्रीकरण असेल त्या दिवशी फावल्या वेळात अभ्यास करीत असते. शाळेमध्ये रोज जाणे जमत नसले तरी घरी मात्र दररोज अभ्यास करीत असते, असेही रोशनी म्हणाली.