पर्यावरणस्नेही वातावरणात लाडक्या गणराजाचा दरबार भरवणाऱ्या भक्तांचा गौरव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोकसत्ता यांनी आयोजित केलेल्या इकोफ्रेण्डली गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात होणार आहे. या स्पर्र्धेत विजेत्या ठरलेल्यांना एक्स्प्रेस गॅलरी, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पाइंट येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बक्षिसे दिली जातील.
‘आनंदी दरबार भरेल गणराजाचा, जेव्हा लागेल हातभार निसर्गरक्षणाचा’ या पंक्तींचा पुरेपूर प्रत्यय घेतलेल्या मुंबई, ठाण्यातून हजारो भक्तांनी त्यांच्या घरातील आकर्षक आणि पर्यावरणस्नेही आरास छायाचित्रांद्वारे पाठवली. संपूर्ण सणामध्ये पर्यावरणस्नेही वस्तू, पदार्थाचा वापर करून मिळालेला आनंद व निसर्गाविषयीची कृतज्ञताही अनेकांनी पत्रांमधून व्यक्त केली. १४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी असलेल्या गणराजाच्या कृपाछायेत निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याच्या आनंदात आता बक्षिसांचीही भर पडणार आहे. पर्यावरण मंत्री संजय देवतळे, पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीव कुमार मित्तल, जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, जनकल्याण सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नाकर गावस्कर हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीसे दिली जातील.
मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर या विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर न करता पर्यावरणस्नेही सजावट करणाऱ्यांनी छायाचित्र व सजावटीसाठी वापरलेल्या साहित्यादी यादी पाठविणे अपेक्षित होते. स्पर्धेसाठी आलेल्या छायाचित्रांमधून प्रत्येक विभागासाठी स्वंतत्र पारितोषिके देण्यात आली.  
मुंबई विभागातून या स्पर्धेत डॉ. दीपक बडवे यांना प्रथम बक्षिस तर अमित बाबरदेसाई यांनी द्वितीय बक्षिस मिळाले आहे. आनंद लेले, अमोल राणे, अनिल बानपेल, आशुतोष हडकर, चारुशीला जोशी, दत्तात्रय कोठुर, हर्षल नाना भंडारी, कल्पक जयवंत घरात, संजय वर्तक, स्वप्नजा अहेर, निकिता सोनावडेकर, विनोद घोलप, सतीश कोलवणकर, संजय दाते, सागर शरद दुसाणे, किशोर पाटील, महेश तांडेल, मंगेश दिगंबर टेंभूकर, मिलिंद पटवर्धन, प्रकाश जाधव, ज्ञानेश्वर मोरे, रवींद्र चिटणीस, अमित सापळे, आयुष भाले, मधुराम काळे, कविता तवटे, साहिल काणेकर, विजय गायकवाड, दीपक मुरुडकर आणि अजय जोशी यांना उत्तेजनार्थ बक्षीसे मिळणार आहेत. प्रथम क्रमांकास ९९९९ रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह तर द्वितीय क्रमांकास ६६६६ रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह दिले जाईल. २००१ रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे स्वरुप आहे.