नाशिकरोड येथे ‘त्रमासिक परिवर्त’च्या वतीने ‘प्रबोधन उत्सव’ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व नामांतर वर्धापन दिनानिमित्त भूमीहीन व नामांतराच्या चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले.
नाजाबाई सोनवणे, बकुबाई बर्वे, गौतमाबाई कांबळे, उमाबेन मारू व शांताबाई बोढारे या लढाऊ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे ‘सर्वासाठी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान झाले. बाबासाहेबांना केवळ दलितांचेच कर्ते असे अधोरेखित केल्याने त्यांच्या समग्र कार्यकर्तृत्वावर अन्याय करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी मांडले. स्त्रियांसाठी त्यांनी तयार केलेले ‘हिंदू कोडबील’, ओबीसींना सवलती मिळाव्यात यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा, वीज निर्मिती, पाटबंधारे बांधण्यातील त्यांचे योगदान, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संसदेत व रस्त्यावर केलेली आंदोलने यांचा आढावा त्यांनी घेतला. अशा महापुरूषांना जाती, धर्मापुरतेच मर्यादित ठेवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले
नाशिक जिल्हा हा परिवर्तनाच्या चळवळीत सतत अग्रभागी राहिला असून या चळवळीत महिला कार्यकर्त्यांचे योगदानही महत्वपूर्ण असल्यानेच त्यांना अभिवादन करण्याच्या भूमिकेतून संस्थेने प्रातिनिधीक स्वरुपात कार्यकर्त्यां महिलांचा हा यथोचित गौरव घडवून आणल्याचे मुख्य संयोजक व परिवर्त त्रमासिकाचे संपादक प्रा. गंगाधर अहिरे यांनी सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत काभुराज बोढारे व प्रकाश पगारे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन रोहित गांगुर्डे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अ‍ॅड. राजेंद्र चंद्रमोरे यांनी करून दिला.
या प्रसंगी विचारमंचावर नागपूरचे सुधीर भगत, चित्रपट निर्माते प्रविण दामले, माजी महापौर अशोक दिवे, कामगार नेते रामभाऊ जगताप, समीक्षक अरविंद सुरवाडे, गौरव निवड समितीचे अ‍ॅड. अशोक बदसोडे, जयंत बोढारे, शामराव बागूल उपस्थित होते. यावेळी परिवर्त त्रमासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करूणासागर पगारे होते. प्रारंभी सुप्रिया गांगुर्डे हिने प्रेरणागीत सादर केले. या प्रबोधन उत्सवातील विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन किशोर शिंदे, चंद्रकांत गायकवाड आणि प्रा. प्रतिभा जाधव यांनी
केले. या प्रबोधन उत्सवात शाहीर संभाजी भगत यांच्या ‘आंबेडकरी जलशा’ चेही आयोजन करण्यात आले होते.