दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे बुधवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्य़ात आगमन झाले. हे अस्थिकलश सोलापूर व पंढरपूर विभागातील शिवसैनिक व नागरिकांसाठी दर्शनाकरिता ठेवण्यात आले आहेत.
शिवसेनेचे सोलापूर विभागाचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील व पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे (कुर्डूवाडी) हे सरसेनापतींचे अस्थिकलश घेऊन मुंबईहून सोलापूरला आले. सायंकाळी मोहोळमार्गे हे अस्थिकलश सोलापुरात आणले गेले. त्यावेळी शेकडो शिवसैनिकांनी भावविवश होऊन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. नंतर पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ अस्थिकलश काही वेळ दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, पालिका गटनेते भीमाशंकर म्हेत्रे आदींनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन दिवंगत सरसेनापतीला श्रध्दांजली अर्पण केली. उद्या हे अस्थिकलश पूर्वभागात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. हे अस्थिकलश नंतर शेजारच्या कर्नाटकातील कुडल संगम येथे विसर्जित केले जाणार आहेत.
तत्पूर्वी, बार्शी येथे सकाळी अस्थिकलशाचे आगमन झाले. नंतर सौंदरे, पानगाव, काळेगाव फाटा, बाणेगावमार्गे वैराग येथे अस्थिकलश आले असता शेकडो नागरिक व शिवसैनिकांनी नतमस्तक होऊन अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
पंढरपूर विभागासाठी पाठविण्यात आलेल्या अस्थिकलशाचे विसर्जन येत्या शुक्रवारी, २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत केले जाणार आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार शिवशरण पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.