शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचा कलश पुण्यात आणण्यात आला असून शेकडो शिवसैनिकांसह पुणेकरांनीही त्याचे दर्शन घेऊन मंगळवारी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे शिवसेनेचे शहर कार्यालय आहे. या कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता हा कलश आणण्यात आला. शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ, नगरसेवक प्रशांत बधे तसेच शशिकांत सुतार, रमेश बोडके, नाना वाडेकर, श्याम देशपांडे, रामभाऊ पारीख, सुभाष सर्वगौड, शेखर चौधरी, अजय भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पदाधिकारी, नगरसेवक यांनी दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी कलशाचे दर्शन घेतले. शिवसैनिक यावेळी नतमस्तक होत होते. इस्कॉन मंदिरातील भाविकही यावेळी उपस्थित होते. त्यांनी विविध भजने यावेळी सादर केली. सायंकाळी सहापासून हा कलश कोथरूड येथील श्री शिवाजी पुतळ्याजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर माणिकबागेतील गणेश मंदिर येथे कलश ठेवण्यात आला होता. रात्री पुन्हा शिवसेना भवनात कलश आणण्यात आला.
अस्थिकलश बुधवारी सायंकाळपर्यंत पुण्यात ठेवला जाणार असून सकाळी नऊ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात तो दर्शनासाठी असेल. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता गरवारे बाल भवन येथे आणि दुपारी चार वाजता हडपसर गाडीतळ येथे कलश ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.