नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे स्मृती पुरस्कार यंदा हितवादचे शहर संपादक राहुल पांडे यांना जाहीर झाला आहे. युगांतर शिक्षण संस्था, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व  टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शाल, श्रीफळ, चांदीचे स्मृती चिन्ह व रोख १५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १६ जानेवारीला दिवंगत बाळासाहेब तिरपुडे यांच्या जयंती दिनी पत्रकार भवनात सकाळी साडेदहा वाजता आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. माजी खासदार बनवारीलाल पुरोहित प्रमुख पाहुणे तर राजकुमार तिरपुडे अध्यक्षस्थानी राहातील.
राहुल पांडे यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून १९९८ मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला. विदर्भावरील अन्यायाबाबत त्यांनी बरेच लेखन केले आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघात विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. याआधी त्यांना स्व. चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार तसेच एन. राजन स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.