हिंदुत्वाचा आवाज म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची देशभर ओळख झाली. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून शिवसेनेच्या विचारधारेत आणले. त्यांचा शब्द म्हणजे  तोफ होती. सामान्य माणसाच्या हृदयातील ते देवस्थान होते. त्यांचे विचार राष्ट्रप्रेमाचे इंद्रधनुष्य होते, असे मत पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे मंत्री व काँग्रेसचे आमदार सुरेश नवले यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात बुधवारी बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. चंद्रकांत नवले यांच्यासह माजी आमदार व विविध पक्ष-संघटनांचे नेते उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विचारांची महाराष्ट्रासह देशाला गरज आहे, असे नवले यांनी सांगितले.
नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, राजकारणातील नेतेमंडळींना अनेक आघाडय़ांवर लढावे लागत असल्याने त्यांचा प्रत्येक ठिकाणी वेगळा मुखवटा दिसतो. त्यामुळे जीवनात विविध ठिकाणी विविध प्रकारचे मुखवटे असणारे नेते आढळून येतात. आयुष्यभर सत्तेपासून दूर राहून जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले. राजकारणाच्या पलीकडे सर्व पक्षातील व क्षेत्रात जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. माजी आमदार सुनील धांडे यांनी,‘‘ सामान्य तरुणाला शिवसेनेने संधी दिली. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी आमदार उषा दराडे यांनी, ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला जमलेला जनसमुदायच त्यांचे जनतेशी अतूट नाते असल्याचे द्योतक होते, असे नमूद केले. राजेंद्र जगताप यांनी शिवसेनेची शिस्त इतर कोणत्याही संघटनेत दिसून येत नाही. त्यांचा शब्द अंतिम होता, असे सांगितले. आमदार बदामराव पंडित यांनी, बाळासाहेब हे बहुगुणी नेतृत्व असल्याचे सांगितले. साहेबराव दरेकर यांनी, महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारा नेता, तर अ‍ॅड. चंद्रकांत नवले यांनी, आपण जे घडलो, ते शिवसेनाप्रमुखांमुळे घडलो. त्यांचे ऋण सात जन्मात फेडता येणार नाहीत व त्यांचे विचार आजही आपल्या मनात असल्याचे सांगितले. अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांनी, नगरपालिकेने बाळासाहेबांचा अर्धकृती पुतळा उभा करावा, अशी सूचना केली. जिल्हाप्रमुख पिंगळे यांनी ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले.