कर्ज मंजुरीसाठी महिलेकडून ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अनाळा शाखेचा व्यवस्थापक राजाराम निंबाळकर व खासगी मदतनीस सुनील कोलते या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यातील कोलते हा रोहकल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच आहे.
परंडा तालुक्यातील अनाळा येथील पुष्पा बाबुराव तेली या महिलेने किराणा दुकान चालविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत ९ महिन्यांपूर्वी एक लाख रुपये कर्ज मागणीचा अर्ज केला होता. त्यासाठी रीतसर प्रस्ताव शाखा व्यवस्थापकाकडे दिला. तेव्हापासून शाखा व्यवस्थापक निंबाळकर याच्याकडे त्या पाठपुरावा करीत होत्या. मात्र, दोन-चार दिवसांनी या, तुमची कर्जाची फाईल हरवली आहे, दुसरी तयारी करावी लागेल, असे सांगून निंबाळकर टाळाटाळ करीत असे. बुधवारी पुन्हा तेली यांनी निंबाळकरची भेट घेऊन कर्ज रकमेची मागणी केली असता कर्ज मंजूर करून डी.डी. देतो. त्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तेली यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. गुरुवारी दुपारी तेली बँकेत आल्या. ठरल्यानुसार निंबाळकर यांनी लाचेची मागणी केली. ही रक्कम त्यांच्या ओळखीचे सुनील कोलते यांच्याकडे देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारून नोटा मोजत असताना पथकाने कोलते यास पकडले. निंबाळकर व कोलतेविरुद्ध अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.