शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळण्याच्या अनुषंगाने बँकांनी ग्रामीण भागात विशेषत: गडचिरोली, मेळघाट, नंदूरबारसारख्या ठिकाणी आपल्या शाखांचा विस्तार करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांनी केले.  
राज्यात बँक सेवांचा विस्तार करण्यासंदर्भात खापरी येथील मिहान प्रकल्पाच्या कार्यालयात त्यांनी विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या दरम्यान त्यांना सेवेच्या विस्ताराचे आवाहन केले.
बठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. िशदे, आदिवासी विकास आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांच्यासह विविध जिल्ह्य़ांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.  गडचिरोली आणि मेळघाटसारख्या ठिकाणी अतिदुर्गम भागात बँकांचे जाळे निर्माण होणे आवश्यक आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ आता नागरिकांना थेट त्यांच्या खात्यात अनुदानाच्या स्वरूपात जमा होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनांच्या विस्तारासाठी तसेच नागरिकांना त्यांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्डासोबत बँक खाते आवश्यक असल्याने बँकानी ठिकठिकाणी आपल्या शाखा सुरू कराव्यात, असे ते    म्हणाले.  
यावेळी त्यांनी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्याच्या कामांचा आढावा घेतला. तसेच जिल्हानिहाय आधार व बँक शाखांची माहिती घेतली.
विशेषत: गडचिरोली, मेळघाट, नंदूरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून तेथील बँकिंग स्थितीचा आढावा घेतला.
मुंबई येथे विविध योजनांचे असंख्य लाभार्थी आहे. ते वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहे. हे सगळे लाभार्थी आधार व बँक सेवेने जोडले गेले पाहिजे.
ग्रामीण भागात बँकांनी जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. टपाल खात्याची ग्रामीण भागात चांगली सुविधा आहे.
त्याच धर्तीवर बँकांच्या सुविधा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करून बँकांनी राज्यात विविध सेवेच्या विस्तारासाठी सहकार्य करावे, असे बांठिया यांनी सांगितले.