मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ‘अश्लील चित्रफीत काढणाऱ्या या नराधमापासून ‘सावधान’ या भित्तिपत्रकांनी खळबळ उडाली आहे. मात्र हे भित्तिपत्रक पोलिसांनी प्रसारित केले नसून एका आगामी मराठी चित्रपटाच्या जाहिरातीसाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. एखाद्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि चित्रपट चर्चेत आणण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ही भित्तिपत्रकाची कल्पना राबविण्यात आली आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची जाहिरात आणि प्रसिद्धी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या कल्पना लढवीत असतात. ‘जाफ्रान फिल्म्स’च्या आगामी ‘चित्रफीत ३.० मेगापिक्सल’ या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मिती संस्था तसेच लेखक-दिग्दर्शक दिवाकर घोडके यांनी हा प्रसिद्धीचा मार्ग अवलंबिला आहे. चित्रपट ज्या संकल्पनेवर आधारित आहे, त्याचाच आधार घेऊन ही भित्तिपत्रके प्रसिद्धी करण्यात आली आहे.
सध्या सोशल नेटवर्किंग साइटवरील ‘फेसबुक’, त्यावर अपलोड होणारे सेल्फी हे विशेष चर्चेत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा झाला आहे, तसाच काही जणांकडून याचा दुरुपयोगही करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक तरुण एका तरुणीच्या आयुष्यातील खासगी क्षण चव्हाटय़ावर आणतो आणि एकच खळबळ उडते, असे क थानक या चित्रपटाचे आहे. त्यामुळे चित्रपटाची वेगळ्या प्रकारे प्रसिद्धी करण्यासाठी आणि तो चर्चेत आणण्यासाठी याची अशी ‘भित्तिपत्रक’ प्रसिद्धी करण्यात आली.
आजची तरुण पिढी चंगळवाद, भोगवादी संस्कृती, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, व्यसनाधिनता, काही तरी मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी असलेली तयारी, तरुण-तरुणींमधील मोकळे संबंध, यातून होणाऱ्या समस्या, गुन्हे हे अलीकडच्या काळात वाढत चालले आहे. याचाच फायदा काही जणांकडून घेण्यात येत असून त्याला तरुणी, महिला बळी पडत आहेत. आजच्या वास्तवतेचे चित्र या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशीष पाथोडे, सीमा आझमी, रवी पटवर्धन आणि अन्य कलाकार या चित्रपटात आहेत.