राज्यात गुटखा बंदी असली तरी त्याचा फायदा मात्र तस्करांनी उचलला असून गेल्या सहा महिन्यातच हे पुरवठादार ‘मालामाल’ झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी अंजनगाव सुर्जीतील एका गोदामावर छापा घालून नोएडा (उत्तर प्रदेश) मध्ये उत्पादित ४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशातून एस.टी. बसमधून आणला जाणारा गुटखा अमरावती आणि परतवाडय़ातून जप्त करण्यात आला. छुप्या मार्गाने मोठय़ा प्रमाणावर गुटखा येत असतानाही त्यावर अंकूश ठेवणे अशक्यप्राय बनले आहे. ही गुटखा बंदी लोकांच्या ‘भल्या’साठी की तस्करांच्या ‘लाभा’साठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात गेल्या वर्षी जुलै महिन्यात गुटखा बंदी लागू केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने महिनाभरात धडक कारवाई करताना अमरावती विभागातून सुमारे ३८ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला, पण नंतर कारवाई अचानक थंडावली. ऑगस्ट २०१२ मध्ये अन्न व औषध प्रशासन आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावतीत संयुक्त कारवाई करताना रामपुरी कॅम्प आणि खत्री कॉम्प्लेक्समधील गोदामांवर छापे घालून १४ लाख ६१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईबद्दल अन्न व औषध प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली होती, पण त्यानंतरही गुटख्याचा ओघ सुरूच आहे. जिल्’ाात मध्यप्रदेशातून गुटख्याची आयात वेगवेगळ्या मार्गाने होत असल्याचे दिसून आले आहे. तस्करांनी कुणाला संशय येऊ नये म्हणून मध्यप्रदेशातून येणाऱ्या एस.टी. बसगाडय़ांमधून गुटख्याचा साठा आणण्यास सुरुवात केली. एकाच वेळी मोठा साठा आणण्यापेक्षा ५० ते ६० हजार रुपये किमतीचा माल आणायचा आणि वापरात नसलेल्या लहान गोदामांमध्ये तो भरून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवायचा, अशी या पुरवठादारांची कार्यपद्धती आहे. याशिवाय, रेल्वेमधूनही आंध्रप्रदेशातून गुटखा आणला जात आहे. गुटखा बंदीनंतरही दाम मात्र दुप्पट आणि तिप्पट दराने गुटख्याच्या पुडय़ा शहरात सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे.
२९ जानेवारीला शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात बऱ्हाणपूर ते अमरावती या एस.टी. बसमधून ५० हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले. अशाच पद्धतीने परतवाडा येथेही कारवाई करण्यात आली. शनिवारी अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने अंजनगाव सुर्जी येथील अग्रवाल यांच्या गोदामावर छापा घालून ३ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. सितार आणि विमल कंपनीचा हा गुटखा नोएडा येथील कारखान्यात तयार झाल्याचे दिसून आले. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागापर्यंत या पुरवठादारांचे जाळे पसरले असल्याने गुटख्याची विक्री रोखणे हे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान होऊन बसले आहे.
कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, अशी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची तक्रार आहे. दुसरीकडे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने अनेक वेळा कारवाई होत नाही, असेही दिसून आले आहे. एखाद्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली जाते, पण पुरवठादारांचे जाळे एवढे विस्तारलेले आहे की, कारवाईच्या वेळी फार कमी साठा यंत्रणेच्या हाती लागतो. गुटखा बंदीमुळे शौकिनांच्या खिशाला कात्री लागत असली तरी पुरवठादारांचा चांगलाच लाभ होत असल्याचे चित्र आहे.