कारंजा लाड पालिकेने केलेल्या भरमसाठ करवाढीच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सोमवारी शहरात मोर्चा काढून भिकमांगो आंदोलन करण्यात आले. कारंजा लाड येथील आंबेडकर चौकातून भाजपच्या भिकमांगो मोर्चास प्रारंभ करण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी व शहरवासीयांनी भाजपच्या झोळीत आपल्या यथाशक्तीनुसार पशाच्या रूपात भीक टाकली. या आंदोलनात जनतेने दिलेली भीक व त्यासोबत कारंजा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन अवास्तव करवाढ रद्द करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.  कारंजा पालिकेव्दारे दर चार वर्षांनी कर निर्धारण करण्यासाठी मालमत्तेचे फेरमूल्यांकन करण्यात आले. २०१६ पर्यंत ही कर आकारणी लागू राहील. मागील कर आकारणीपेक्षा यावेळी केलेल्या सर्वेक्षणा नुसार अव्वाच्या सव्वा अशी अवास्तव करवाढ कारंजा पालिकेने केली असून कोणत्या नियमाने व कोणत्या पध्दतीने केली, याबद्दल निवेदनातून जाब विचारण्यात आला.
कारंजा पालिकेची स्थापना १८८५ मध्ये झाली असून तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळाला पालिकेने कर आकारला नव्हता, परंतु यावेळी धार्मिक स्थळांना सुध्दा अवाजवी कर आकारण्यात आला तो रद्द करावा, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली. कर आकारणीच्या वेळी मालमत्तेचे वय सुध्दा लक्षात घेणे आवश्यक असून जुन्याच मालमत्तेवर नवीन मालमत्तेप्रमाणे कर आकारलेला आहे. हा कर किती तरी पट किंवा टक्केवारीने अवास्तव आहे. ही करवाढ सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी असून पालिकेव्दारे शहरातील साफसफाई, दिवाबत्ती, रस्त्यावरील खड्डे, उकिरडय़ाचे ढीग व तुंडुब भरलेल्या नाल्या या गोष्टीचा विचार केला असता पालिका प्रशासन कुठल्याही नागरी सुविधा न देता अवास्तव कर आकारणी करुन जनतेस वेठीस धरत आहे. पालिकेजवळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देयके देण्याकरीता पसे नाहीत तर मग शहराचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला देण्यासाठी ६0 लक्ष रुपये कुठून आलेत. असे अनेक प्रश्न माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले.
या मोर्चात भाजपचे पदाधिकारी, कार्यकत्रे शहरातील  नागरिक   बहुसंख्येने    सहभागी  झाले होते.