तुमची गाडी सिग्नलवर हिरव्या संकेतची वाट पाहत उभी आहे. तेवढय़ात तुमच्या वातानुकूलित गाडीच्या काचेवर टकटक आवाज ऐकू येतो. अर्धवस्त्र, काळाठिक्कर चेहरा, हातात छोटे मूल, केस विस्कटलेले यावरून हा भिकारी आहे हे कळण्यास फार वेळ लागत नाही. भीक दिल्याने भिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याने भीक न देण्याचा दृढनिश्चय मनाशी केलेला असतो. त्यामुळे गाडीच्या काचा खाली करण्याचा प्रश्नच येत नाही, पण.. पण त्याच वेळी त्या भिकाऱ्याने हातवारे करून पाणी मागितले तर तुम्ही काय कराल. त्यात गाडीत आई, बाबा, पत्नी, मुले असतील तर त्यांच्या आग्रहास्तव तुम्हाला माणसुकीच्या पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही आणि याच वेळी पाणी देण्यासाठी काचा खाली केलेल्या खिडकीतून भीक मागण्यासाठी दुसरा हात पुढे केला जातो. हाच नवीन फंडा सिग्नलवर भीक मागणाऱ्यांनी अवलंबण्यास सुरुवात केली आहे. दानशूरपणाचा आव आणताना भीक देण्याची वाढलेली प्रवृती, कमी श्रमात मिळणारा मुबलक पैसा, हा पैसा साठवून व्याजाने देण्याची वृत्ती, अठरा विश्वे दारिद्रय़, असाध्य आजार, वाढलेला वैद्यकीय खर्च, व्यसनाधीनता आणि ज्येष्ठांकडे होणारे मुलांचे दुर्लक्ष यामुळे राज्यातील बडय़ा शहरांत भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला नवी मुंबई अपवाद नाही. उलट या शहरातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न इतर शहरांपेक्षा जास्त असल्याने दानशूर रहिवाशांची संख्याही जास्त आहेत. त्यामुळे येथील ३० सिग्नलपैकी ११ मोठय़ा सिग्नलवर अलीकडे भिकाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.कालपरवापर्यंत ‘भगवान के नाम पे दे दे बाबा, भगवान तेरा भला करेगा, तेरे बालबच्चे सुखी रहेंगे’ या आशीर्वादपर आर्जव करणारे भिकारी अलीकडे सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या गाडय़ांकडून अक्षरश: खंडणी मागितल्यासारखी भीक मागत असल्याचे दिसून येते. यात बंद गाडय़ांच्या काचांवरील टकटक तर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भिकारी नको, पण टकटक आवर असे म्हणणारे वाहनचालक चिल्लर देऊन स्वत:ची सुटका करून घेत असल्याचे दिसून येते; मात्र चिल्लर देणाऱ्या वाहनचालकाकडे कुत्सितपणे लूक देण्यारे भिकारीदेखील कमी नाहीत. काही भिकाऱ्यांनी भीक देणाऱ्यांच्या समोर चिल्लर फेकून दिल्याची उदाहरणे आहेत. या सर्व भीक मागण्याच्या कलेत आता एका नवीन कलेची भर पडली असून सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या गाडीत पिण्याच्या पाण्याची बाटली हेरून ‘साहब, पाणी दे दो ना’ अशी आर्जव हातवारे करून केली जाते. भर उन्हात भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला पैसे देण्याऐवजी पाण्याचे चार थेंब पाजल्यास पुण्य पदरात पडेल या विचाराने वाहनचालक लगेचच गाडीच्या काचा खाली करून अर्धी भरलेली पिण्याची बाटली देतो. तुमच्यासमोर पाण्याच्या बाटलीला तोंड लावतच एक हात हळूच तुमच्या गाडीच्या खिडकीतून आत येतो. त्यात भीक देण्याची अपेक्षा असते. हात आत आल्याने काचाही वर करता येत नाहीत. पाणी दिल्यानंतर देण्याची मानसिकता तयार झालेला वाहनचालक गाडीतील चिल्लर शोधून भिकाऱ्यांच्या दुसऱ्या हातावर टेकवतो. ‘कैसा बनाया’ असे मनाशी म्हणत एक स्मितहास्य देऊन तो भिकारी नंतरच्या सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या गाडीची वाट पाहण्यासाठी निघून जातो. तोपर्यंत भीक देणार नाही हा मनाशी केलेला निश्चय मागे पडल्याने पश्चात्ताप करण्याशिवाय वाहनचालकाकडे दुसरा पर्याय उरत नाही.