प्रजासत्ताक दिन साजरा करायला काही तास शिल्लक असताना कामोठेमधील प्रवाशांनी आपल्या हक्काचा प्रवास टिकावा यासाठी रिंगण करून प्रजेला कायद्याप्रमाणे वाहतूक सेवा मिळू द्या, अशी आग्रही मागणी जाहीरपणे मांडली. कामोठे पोलीस ठाण्यासमोरील चौकात प्रवाशांनी आपआपली मते बिनदिक्कतपणे मांडली. या वेळी सुमारे ८० सामान्य प्रवासी येथे उपस्थित होते. ही सभा घडवून आणण्यासाठी कफ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्तावाचे मानले जात आहे. कामोठे बससेवा सुरूच राहावी आणि उलटसरशी ती शहरांतर्गत फिरावी, असे या वेळी प्रवासी ठणकावून सांगत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्षाचालकांना पोट आहे, तसे प्रवाशांनाही पोट आहे, तुम्ही मीटरप्रमाणे कायदेशीर रिक्षा चालवा. आम्ही बसमधून जायचे की रिक्षातून तो आमचा अधिकार आहे. त्या अधिकारावर तुम्ही गदा आणू नका, असे मत या सभेसाठी जमलेले सर्वच सामान्य असंघटित प्रवाशांनी मांडले. कोणतीही बॅनरबाजी नाही, कोणताही भोंगा नाही तरीही ८० सामान्य प्रवासी एकवटले होते. कामोठे वसाहतीमधील प्रवाशांच्या दबलेला आवाजाला त्यानिमित्ताने व्यासपीठ मिळाले. स्थानिक या तीन अक्षरी शब्दाने रोज होणाऱ्या कुचंबणेतून मुक्तता मिळावी यासाठी महिलांच्या स्त्री-शक्ती या सभेची प्रवाशांच्या वतीने सुरुवात केली.
पोलीस व एनएमएमटी प्रशासनाने सुरुवात केलेल्या या बससेवेमुळे प्रवाशांचा निम्मा वाहतूक खर्च बचत होत असल्याचे या वेळी मांडण्यात आले. तसेच रिक्षांना आमचा विरोध नाही, मात्र मनमानी कारभार व मुजोरी थांबविली पाहिजे, असे या महिलावर्ग प्रवाशांचे मत होते. या वेळी डी. टी. म्हात्रे या प्रवाशाने एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांनी नम्रतेने प्रवाशांना वागणूक द्यावी तसेच महिला प्रवासी येत असल्यास किमान हात दाखविल्यावर बस थांबवावी, सुटय़ा पैशांसाठी प्रवाशांशी विनम्रतेने वागण्याचे आवाहन केले.
रिक्षाचालकांच्या मागणीसाठी एनएमएमटी बससेवेचे थांबे कमी करण्याऐवजी काही प्रवाशांनी या सभेत थांब्यांमधील अंतर कमी करून शहरांतर्गत नवीन मार्ग सुरू करण्याची व ५७ क्रमांकाची बससेवा ही प्रवाशांचा ओघ पाहून चालू ठेवण्याची मागणी या सभेत केली. विशेष म्हणजे स्थानिक रिक्षाचालक सध्या असणारे बसथांबे कमी करावेत, बससेवा शहरांतर्गत न फिरविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत आहेत. ५७ क्रमांकाची बससेवा कामोठेकरांना फायदेशीर ठरणारी बससेवा आहे. त्यामुळे ती सुरूच ठेवावी त्या व्यतिरिक्त अजून मानसरोवर ते कळंबोली, रोडपाली, खांदेश्वर रेल्वेस्थानक ते खांदा कॉलनी पनवेल, कळंबोली हायवे ते खांदेश्वर रेल्वेस्थानक अशी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.
या सभेसाठी कफच्या वतीने अरुण भिसे, मनोहर लिमये, अर्चिस लिमये, अमित रणदिवे, संदेश पाटील, कफचे सचिव मनोज कोलगे, रमेश चव्हाण, संदीप शिंदे, प्रकाश धनावडे, पंकज रुपारेल तसेच कामोठे रहिवासी संघाचे पदाधिकारी एस. डी. कोटियन, सी. डी. शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामोठे विभागातील संतोष गवस, रोहित दुधवडकर, विशाल चौधरी, दिलीप चव्हाण, जयकुमार डिगोळे, नितीन उंडे, प्रफुल्ल पाटील, घनश्याम वंजारी, करण मोरे, किरण थोरात, अमर पाटील यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best bus service in kamothe
First published on: 28-01-2015 at 07:27 IST