सोलापूर जिल्हय़ासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी मिळविण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत असताना प्रत्यक्षात अलमट्टी धरणापेक्षा पुणे जिल्हय़ातील भामा-आसखेड धरणाचे पाणी सोलापूरसाठी मिळणे अधिक सहज सुलभ आहे. परंतु केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोष नको म्हणून त्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नसल्याचे दिसून येते.
राजगुरुनगर तालुक्यातील भामा नदीवर ८ टीएमसी क्षमतेचा हा भामा-आसखेड प्रकल्प आहे. या धरणात सध्या ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर होत नाही. त्यामुळे या धरणातून सोलापूरसाठी दोन टीएमसी पाणी सोडणे उचित आहे. याबाबतची मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अलीकडेच जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती. या मागणीवर नंतर कोणीही बोलायला तयार नाही. सोलापूरच्या उजनी धरणात वरच्या धरणातून म्हणजे पुणे जिल्हय़ातून पाणी देण्याची मागणी जिल्हय़ातील सत्ताधारी राष्ट्रवादी आमदारांनी उचलून धरली होती. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी पुणे जिल्हय़ातून पाणी मिळण्यासाठी प्रसंगी आमदारकीवर ‘पाणी’ सोडण्याचा इशारा दिला होता. परंतु नागपूर येथे अजित पवार यांनी पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याच्या मागणीस स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे आता पुणे जिल्हय़ातून सोलापूरसाठी पाणी सोडण्याच्या मागणीबाबत कोणीही बोलत नाहीत. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भामा-आसखेड धरणातून पाणी मिळणे सहज शक्य असल्याबद्दल जोरदार आग्रह धरला आहे. नंतर या मागणीवर अजित पवार यांची वक्रदृष्टी नको म्हणून अन्य कोणीही बोलायला तयार नाही.
भामा-आसखेड धरणाचे पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. हे धरण उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. पुणे व सोलापूर हे दोन्ही जिल्हे भीमा खोऱ्यातील असल्यामुळे व दोन्ही धरणांचे एकमेकांतील भौगोलिक अंतर जवळचे असल्यामुळे हे पाणी मिळण्यासाठी सुलभपणे मिळू शकते, असा मोहिते-पाटील यांचा दावा तथा आग्रह आहे. भामा-आसखेड धरण ज्या नदीवर आहे, त्या भामा नदीचा काळूस शेळिपपळगाव गावाजवळ भीमा नदीशी संगम होतो. तेथून हे पाणी उजनी धरणात सहज व सुलभपणे येऊ शकते, असे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. मात्र राजकीय दबाव निर्माण करण्याची सोलापूर जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींची िहमत नसल्यामुळे भामा-आसखेड धरणाचे कितपत मिळेल, याबद्दल साशंकता आहे, तर याउलट, अलमट्टी धरणातील पाणी प्रत्यक्षात मिळणार की केवळ त्याचे गाजर दाखविले जात आहे, याबद्दल जिल्हय़ातील शेतकरी व नागरिक साशंक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2013 रोजी प्रकाशित
भामा-आसखेड धरणाचे पाणी सोलापूरला मिळणे सहज शक्य
सोलापूर जिल्हय़ासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी मिळविण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत असताना प्रत्यक्षात अलमट्टी धरणापेक्षा पुणे जिल्हय़ातील भामा-आसखेड धरणाचे पाणी सोलापूरसाठी मिळणे अधिक सहज सुलभ आहे. परंतु केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोष नको म्हणून त्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नसल्याचे दिसून येते.
First published on: 06-01-2013 at 08:36 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhama askhed dam water easily possible to solapur