जनलोकपाल विधेयक संमत झाल्यास भ्रष्टाचार संपेल, या भ्रमात मी नाही. जनतेत जागृती व्हावी, या साठी मार्चनंतर देशभर आपण दौरा करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
उमरगा तालुक्यातील कवठा येथील भारत विकास प्रतिष्ठानतर्फे भारतभूषण पुरस्काराने हजारे यांना शुक्रवारी गौरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ या स्वरूपातील पुरस्कारासह ग्रामस्थांतर्फे पुढील कार्यासाठी हजारेंना ५१ हजार रुपयांची थली देण्यात आली. लोकपाल विधेयक पारीत झाल्यानंतर देशभरातून विविध ठिकाणांहून सत्काराचे निमंत्रण आले. मुळात सत्कार मला आवडत नाही. मात्र, कवठा ग्रामस्थांनी मोठा आग्रह केला व न्या. देशमुख यांच्या हस्ते सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ हाताने सन्मान होत आहे, हे लक्षात घेऊन संमती दिल्याचे अण्णा म्हणाले. जनलोकपाल विधेयकामुळे भ्रष्टाचाराला ५० टक्के आळा बसेल. त्याच्या अंमलबजावणीसाठी, लोकांना जागे करण्यासाठी आपण देशभर फिरणार आहोत. लोकप्रतिनिधींना नाकारण्याचा व परत बोलवण्याचा अधिकार, ग्रामसभेचे अधिकार व जनतेचे संघटन या साठीही प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीही लक्ष घालणार असल्याचे हजारे म्हणाले. ‘माल खाये मदारी और नाच करे बंदर’ ही नीती चालू देणार नाही. सरकारचे नाक दाबल्यानंतर तोंड उघडेल, अशी संघटनशक्ती उभारणार असल्याचे ते म्हणाले.
विनायकराव पाटील यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. पाशा पटेल यांनी अण्णा हजारे यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करावे. शेतकऱ्यांचा प्रश्न देव, दैवाचा नाही तर चुकीच्या धोरणांमुळे तो निर्माण झाला असल्याचे सांगितले. आमदार देशमुख यांनी अण्णांचे समाजातील स्थान त्यांचे चारित्र्य व नतिकता यामुळेच आहे. त्यांच्याकडील या गोष्टी राजकारण व समाजकारण करणाऱ्यांनी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांनी नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी न्या. देशमुख यांनी केवळ कायदे करून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, तर त्याची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. शासकीय सेवेत काम करणाऱ्यांना आहे, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना राबवली पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी दिलीप नागरगोजे उपस्थित होते. जनलोकपालची िदडी काढून हजारे यांचे स्वागत करण्यात आले.
तयार कपडय़ाचे दुकान!
हजारे यांनी भाषणात मार्मिक उदाहरण दिले. बाजारात तयार कपडय़ांचे दुकान असते. कोणाचेही माप घेऊन ते कपडे शिवलेले नसतात. मात्र, कपडे विकत घेणाऱ्याला ते आपल्याच मापाचे आहेत, असे वाटते. कोणाची सत्ता व कोणता पक्ष आहे, यात न अडकता विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
अण्णा हजारे भारतभूषण पुरस्काराने सन्मानित
जनलोकपाल विधेयक संमत झाल्यास भ्रष्टाचार संपेल, या भ्रमात मी नाही. जनतेत जागृती व्हावी, या साठी मार्चनंतर देशभर आपण दौरा करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
First published on: 01-02-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatbhushan award to anna hajare