गणेशोत्सवातील बंदोबस्त
गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी सर्वाधिक ताण पोलिसांवर येत असतो. गणपतींची आरास पाहण्यासाठी सहकुटुंब फिरणाऱ्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासह समाजकंटकांवर देखरेख ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागत असल्याने प्रमाणापेक्षा त्यांना अधिक तास काम करावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करता पोलीस दलावरील ताण कमी करण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक वेदप्रकाश भाटिया यांनी काही उपाय सुचविले आहेत.
अतिरेकी कारवाया, खिसेकापू, जुगारी टोळ्या यांची संख्या खूपच वाढली असून लोक घरास कडीकुलूप लावून गणेशोत्सव पाहण्यास जात असतात. त्यांच्या अनुपस्थितीत घराचे कडी-कोयंडे तोडून मोठय़ा प्रमाणात चोऱ्या होत असतात. हे थांबविण्यासाठी भाटिया यांनी सुचविलेले उपाय योग्य ठरू शकतात. नाशिकमध्ये सर्व गणेशोत्सव मंडळांची आरास शहरातील मोठय़ा मैदानांवर करण्यात यावी. उदाहरणार्थ गोल्फ क्लब मैदानात प्रत्येक गणेशोत्सव मंडळास त्याच्या गरजेप्रमाणे जागा आखून द्यावी. क्षेत्रफळानुसार भाडे गणेशोत्सव मंडळाकडून महानगरपालिकेने वसूल करावे. भालेकर हायस्कूल, शालिमार चौकी व परिसर, मराठा हायस्कूल, भोसला विद्यालय यांसह अन्य शाळा व विद्यालये, महाविद्यालयांची पटांगणे, गंजमाळ बस स्थानक, पंचवटी विभाग, श्रीराम विद्यालय, गुजराती विद्यालय, बाजार समिती आवारातील रिकामी जागा, ज्या आपणास सोयीच्या व योग्य वाटतील, उपलब्ध होतील अशा मोजक्या ठिकाणीच सर्वानी गणेशोत्सवाची आरास करण्याची सूचना भाटिया यांनी केली आहे.
या योजनेमुळे ठरावीक ठिकाणीच आणि प्रवेशद्वारावरच बंदोबस्ताची गरज भासणार असल्याने पोलीस बळ खूपच कमी लागेल, प्रवेशद्वारावरच दोन पोलीस आत जाणाऱ्या व्यक्तीची तपासणी करतील. त्यांच्यावर नजर ठेवतील. संशयितांना ताब्यात घेतील. यामुळे पोलीस खात्यावरील ताण निम्म्याने कमी होईल.
या व्यवस्थेमुळे महानगरपालिकेला मोठय़ा प्रमाणात उत्पन्नही मिळू शकेल. पोलीस कर्मचाऱ्यांना इतर सर्व कॉलन्या, सोसायटय़ा, रहिवासी घरे, खासगी बंगले अशा ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने लक्ष देता येईल. पोलीस गस्तही वाढविता येईल.
प्रत्येक मोठय़ा जागेवर स्टॉल लागल्याने गणेशोत्सवासह आनंद मेळाही त्या ठिकाणी भरू शकेल. पाऊस सुरू झाल्यानंतर जनतेला सुरक्षित जागेत उभे राहता येईल. गणेशोत्सवाच्या मंडपामागे किंवा खाली चालणाऱ्या जुगारासारख्या अनिष्ट गोष्टींवर बंधन घालता येईल.
काही पोलीस कर्मचाऱ्यांची अशा ठिकाणी नेमणूक करता येऊ शकेल. गस्ती पोलीस पथकही बंदोबस्तावर लक्ष देऊ शकतील. अशा प्रकारचे अनेक फायदे भाटिया यांनी सुचविलेल्या उपायांमुळे होऊ शकतील.