जवळपास सर्व प्रमुख मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमधील नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. स्थानिक पालिका प्रशासनास खड्डे बुजविण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरांमधील रस्त्यांची डागडुजी पुरेशा गांभीर्याने न केल्याचा हा परिणाम असून त्याचा त्रास आता नागरिकांना होत आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन कंत्राटदारांना जबाबदार धरीत असले तरी अद्याप एकाही कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. कारण कंत्राटदारांच्या नावे शहरातील काही बडी राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधीच रस्त्यांची कामे घेत असल्याचे बोलले जाते. अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा आणि इतर विषय समित्या इतर राजकीय पक्षांकडे असल्याने शहरात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. त्यामुळे खड्डय़ांनी शहरातील सर्व रस्त्यांवर नागरिकांची कोंडी होत असूनही याविरुद्ध कुणीही अद्याप पालिकेवर साधा मोर्चाही नेलेला नाही. मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बदलापूर शहराचीही फारशी वेगळी अवस्था नाही. या शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. विशेषत: पूर्व विभागातील रेल्वे स्थानक ते मांजर्ली रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. गेल्या महिन्यात बदलापूरमधील नगरसेविकांनी रस्त्यावरील खड्डय़ांसंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप तशी महासभाच बोलविण्यात आलेली नाही. सध्या बदलापूर पालिकेत मुख्याधिकारी पदच रिक्त आहे. ठेकेदाराने रस्त्यांची कामे केल्यावर त्याचा दर्जा तपासणे ही पालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र रस्त्यांची अवस्था पाहता, त्यांनी या कामाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तेव्हा ठेकेदारांबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. पालिकेचे लोकप्रतिनिधीच मजूर संस्थांच्या पडद्याआडून कंत्राटे घेऊ लागल्यापासून रस्त्यांची अवस्था बिकट होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकांकडून रस्ते विकास कामे काढून एमएमआरडीएने कामे करावीत, अशीही सूचना एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याने केली आहे.