‘अवतार’ चित्रपटातील बारा फूट उंचीचा नायक जेक्स, नायिका नेयत्री, साडेदहा फूट उंचीची नेयत्रीची आई मोअ‍ॅट, पंचवीस फूट उंचीचा आणि चाळीस फूट लांबीचा महाकाय ड्रॅगन आदी अतिभव्य प्रतिकृती सहकारनगरमधील नाला उद्यानात साकारत असून ध्वनी आणि प्रकाश योजनेच्या माध्यमातून ही अद्भूत दुनिया श्रवणीय व प्रेक्षणीय होणार आहे.
नगरसेवक आबा बागूल यांनी शनिवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या आगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाकाय माणसांच्या आणि महाकाय प्राण्यांच्या प्रतिकृती नवीन वर्षांत पुणेकरांच्या भेटीला दाखल होतील. सहकारनगरमधील बागूल उद्यानामधून वाहणाऱ्या नाल्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याच नाल्याच्या बाजूने बागही विकसित करण्यात आली आहे.
या नाला उद्यानामध्ये ‘अवतार ’ चित्रपटातील विविध प्रतिकृती पाहायला मिळतील. परग्रहावरून आलेले प्राणी व माणसे यांचे थक्क करणारे दर्शन ‘अवतार’ मधून झाले. त्याच चित्रपटातील विविध अतिभव्य व्यक्तिरेखा व महाकाय प्राणी कलादिग्दर्शक नितीन देसाई साकारत आहेत. महापालिकेतर्फे हे काम देसाई यांना देण्यात आले असून संपूर्ण प्रकल्पासाठी वीस लाख रुपये खर्च होणार आहेत.
या परिसरात पं. भीमसेन जोशी कलादालन, तसेच दादासाहेब फाळके फोर-डी थिएटर, जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृतींचे उद्यान, संगीत कारंजे, लेसर शो, फुलपाखरू उद्यान आदी प्रकल्प साकारले असून नाला उद्यानात साकारत असलेल्या महाकाय प्रतिकृती आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील. नाला उद्यानाला ही वेगळी जोड मिळणार असल्यामुळे पर्यटक येथे आवर्जून येतील, असेही बागूल यांनी सांगितले.