यावर्षी चंद्रपूर जिल्हय़ातील जलाशयांवर दुर्मिळ ग्रेटर फ्लेमिंगो या पक्षाचे आगमन झाले आहे. फ्लेमिंगोच्या निरीक्षणासाठी पक्षीमित्रांची जलाशयावर गर्दी झाली आहे.  घनदाट अरण्यप्रदेशाचा हा जिल्हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. दरवर्षी हिवाळय़ाची चाहूल लागताच जिल्हय़ातील विविध जलाशयांवर परदेशी पक्ष्यांची मांदियाळी जमत असली तरी यंदाचे वर्ष पक्षी निरीक्षकांसाठी खास आनंदाचे ठरले आहे. यंदा दुर्मिळ ग्रेटर फ्लेमिंगो आणि पट्टकादंब (बार हेडेड गुज) या पक्षाच्या नोंदीमुळे दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
वाईल्ड केअर संस्थेने जिल्हय़ातील विविध जलाशयांना भेट देत स्थलांतरित पक्षांची नोंद घेतली. यंदाच्या स्थलांतर हंगामात फ्लेमिंगोचे आगमन झाल्याची शुभवार्ता फ्रेन्ड्स ऑफ ताडोबाचे मनोज नलदुर्गकर यांनी दिली होती. त्यानंतर वाईल्ड केअरचे संजय शेगावकर, मनोज भांदककर, निशांत धामणकर यांनी अ‍ॅश पॉन्ड जलाशयासह अन्य जलाशयांनाही भेट देत स्थलांतराचा आढावा घेतला.
अ‍ॅश पॉड जलाशयात यंदा फ्लेमिंगोसह पट्टकादंब, चक्रवाक पक्ष्यांची संख्याही लक्षणीय आहे. याशिवाय चारगांव धरण, जुनोना तलाव, सातारा तुकूम तलाव, इटोली मानोरा, मूलचा तलाव, गडचांदूरातील वर्धा नदीचा परिसर अशा अनेक ठिकाणी फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. विदेशी पक्ष्यांमध्ये स्पूनबिल, पेटेड स्टॉर्क, व्हिजन, स्पॉट बिल, डॅकचिक, कूट, ग्रे हेरॉन, लिटिल रिंग प्लॉवर, गडवाल, गारगेनी, पिनटेल, रेड क्रेस्टेड पोचर्ड या पक्षांसह कॉटन टिल, कार्मोरंट, पर्पल हेरॉन, ब्लॅक इबिस, व्हाईट इबिस, ओपन बिल, स्टॉर्क, ग्रे व्ॉकटेल, लेसर व्हिसलिंग टिल अशा अनेक पक्षांचा समावेश आहे.आता स्थलांतर ऐन भरात आले असून पक्षीनिरीक्षक, अभ्यासक व पक्षीप्रेमींची जलाशयांच्या काठावर पहाटे गर्दी होऊ लागली आहे.