गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या १२ एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त वह्य़ांसोबत दुष्काळग्रस्तांसाठी धान्य एकत्र करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महापौर जयश्री सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आपापल्या भागातून जास्तीत जास्त धान्य गोळा करून देऊ, असा निर्धार कार्यकर्त्यांनी या वेळी केला. या बैठकीत दुष्काळग्रस्तांना धान्य देण्यासाठी २० लाख ४५ हजारांची मदत कार्यकर्त्यांनी जाहीर केली. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे वाढदिवसाच्या नियोजनासंदर्भात ही बैठक झाली.    
या वेळी बोलतांना महापौर सोनवणे यांनी सांगितले की, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षांपासून शुभेच्छांच्या स्वरूपात वह्य़ा देण्याचा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रभर या उपक्रमाचे कौतुक झाले. अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी या वह्य़ा आधार ठरल्या. यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळग्रस्तांसाठी जास्तीत जास्त धान्य गोळा करून दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेतील नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचेही त्यांनी जाहीर केले.    
प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य भरत रसाळे म्हणाले,की वाढदिवसानिमित्त वह्य़ांच्या स्वरूपात शुभेच्छा हा उपक्रम यंदाही सुरूच ठेवणार आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन धान्य गोळा करावे. दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. कार्यकर्त्यांनी या सर्वांपर्यंत पोहोचावे. श्रीराम संस्थेचे माजी सभापती मोहन सालपे यांनी सांगितले की, कसबा बावडय़ातील सर्व प्रभागात नगरसेवक व प्रमुख कार्यकत्यार्ंनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत फेरी काढून धान्य गोळा करण्याचे नियोजन केले आहे.एखाद्याने दिलेले मुठभर धान्यसुध्दा महत्वाचे ठरणार आहे. तांदूळ, गहू व ज्वारी हे धान्य एकत्र करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले की, जमलेले धान्य दुष्काळग्रस्तांपर्यंत व्यवस्थित पोहोचावे, यासाठी कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करावे.    
या वेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, परिवहन समिती सभापती राजू पसारे, शिक्षण समिती सभापती जयश्री साबळे, करवीर पंचायत समिती सभापती सुवर्णा गुरव, गगनबावडा पं.स.सभापती सविता कोटकर, श्रीराम संस्थेचे सभापती विजय कोळी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.