अकलूजजवळ संगम येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष गणेश बाबूराव पराडे (वय ३५) यांचा पूर्ववैमनस्यातून निर्घृणपणे खून करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांविरूध्द अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात मृत गणेश पराडे यांचे बंधू फत्तेसिंह पराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विक्रम ऊर्फ सोनू रवींद्र पराडे, त्याचा भाऊ छोटू पराडे, भालचंद्र बापूराव पराडे, भूषण भालचंद्र पराडे (रा. बाभळगाव, ता. माळशिरस) व कालिदास गोरख तरसे (रा. कोंडभावी, ता. माळशिरस) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. माळशिरस तालुक्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र पराडे यांचा दहा वर्षांपूर्वी खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी रवींद्र पराडे यांच्या मुलांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने भाजयुमोचे गणेश पराडे यांचा खून केला. पराडे हे मोटार सायकलीवरून संगम गावाकडे निघाले होते. त्या वेळी पाठीमागून जिप्सी गाडीतून आलेल्या पाच जणांनी गणेश पराडे यांना अडविले आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते जागीच मरण पावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ट्रकने रिक्षाचालकाला ठोकरले
शहरात पुणे-हैदराबाद बाह्य़वळण महामार्गावर जुन्या कारंबा नाका भागात भरधाव मालमोटारीची ऑटो रिक्षाला धडक बसून त्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. सोमनाथ यशवंत पाटील (वय २७ रा. शेळगी, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. शहरातून जड वाहतुकीला दिवसा संपूर्णत बंदी असताना वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जड वाहतूक खुलेआम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरूणीचा या जड वाहतुकीने बळी घेतला होता. त्यानंतर आता रिक्षाचालकाचाही बळी गेला आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात मालमोटार चालकाविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे.