विधानसभा निवडणुकीच्या निकालातून राज्यातील काँग्रेस आघाडी शासनाप्रमाणेच ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षांनुवर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेविषयीही मतदार कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अवघ्या सहा महिन्याने एप्रिल महिन्यात येणाऱ्या अंबरनाथ-बदलापूर पालिका निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे.
गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकांचा कैवार, ठेकेदारांचा प्रभाव या अपप्रवृत्तीमुळे गेल्या काही वर्षांत शिवसेनेची सर्वसामान्य नागरिकांशी असलेली बांधीलकी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ समाजकारण या हेतूने सेनेत कार्यरत कार्यकर्तेही दुर्मीळ झाले. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये सेनेविषयी कमालीची नाराजी आहे.
अंबरनाथ पालिकेत गेली १५ वर्षे सत्तेत असूनही नागरिकांना किमान नागरी सुविधा पुरविण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या कारभाराविषयी नाराज मतदारांनी मनसेच्या पारडय़ात मते टाकली होती. त्यामुळे मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. यंदा भाजपच्या रूपाने नवा पर्याय नागरिकांना उपलब्ध झाला आहे. मतदानाच्या आकडेवारीवरून विधानसभा निवडणुकीत शहरातील बहुतेक भागात सेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
भाजपला हवे सुशिक्षित चेहरे
बदलापूर शहरात सुरुवातीपासूनच भाजपचे अस्तित्व आहे. आमदार किसन कथोरे आणि सहकाऱ्यांमुळे येथील भाजपची ताकद वाढली आहे. अंबरनाथ शहरात भाजपची संघटनात्मक ताकद तुलनेने अगदीच नगण्य असली तरी संघाचे नेटवर्क ही या पक्षाची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्याआधारे विविध प्रभागातील सुशिक्षित व्यक्तिमत्त्वे शोधून त्यांच्या हाती कमळ सोपविण्याची रणनीती भाजपतर्फे अवलंबली जाईल, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is challenging for shivsena in ambarnathbadlapur
First published on: 21-10-2014 at 06:40 IST