खरीप पेरणीचा हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे व सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २७ जूनला भाजपाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार चैनसुख संचेती यांनी केले आहे.
खामगाव अर्बनच्या हॉलमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला भाऊसाहेब फुंडकर व आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार कुटे म्हणाले, राज्य व केंद्रातील सरकार हे जनतेचे राहिले नाही. महागाई, पेट्रोलच्या किमती वाढवून हे सरकार सर्वसामान्य जनतेला वेठीस धरीत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी सरकारला खाली खेचण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी येत्या २७ जून रोजी भाजपच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाऊसाहेब फुंडकर यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. या बैठकीला आकाश फुंडकर, मोहन शर्मा, नंदू अग्रवाल, सुरेशआप्पा खबुतरे, विजय कोठारी यांच्यासह जिल्ह्य़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.