मुंबईतील वाहनतळांवरील कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने पालिकेने रस्ते विभागातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तैनात केल्यामुळे रस्ते विभागात मनुष्यबळाचा खड्डा पडला आहे. रस्त्यांवरील खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याचे आदेश मिळताच अभियंत्यांनी आता कामगार नसल्याचे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आहे. तर खड्डे बुजविण्यापेक्षा वाहनतळच बरे असे कामगार म्हणू लागले आहेत.
पावसाच्या ‘धारानृत्या’त पेवर ब्लॉक, डांबरी आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची पार दैना उडाली असून मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईकरांनी केलेली आरडाओरड आणि सुरू असलेले विधानसभेचे अधिवेशन या पाश्र्वभूमीवर पालिकेने तातडीने रस्ते ठाकठीक करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. तसेच एकाही अभियंत्याने कार्यालयात न बसता रस्त्यांवर फिरुन मोबाइलवर छायाचित्रे काढून संगणक प्रणालीवर पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून अभियंत्यांनी कार्यालयाबाहेर पडून छायाचित्र काढण्याची मोहीम सुरू केली. मतदारांचा रोष ओढवू नये यासाठी आता नगरसेवकांचीही धावपळ सुरू झाली आहे. खड्डय़ांची छायाचित्रे काढण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील रस्ते विभागाने आता नवे रडगाणे गायला सुरुवात केली आहे.
मुंबईतील वाहनतळांचे ५० टक्के काम महिला बचत गटांना, २५ टक्के बेरोजगार युवकांना आणि उर्वरित २५ टक्के खुल्या पद्धतीने देण्याचा निर्णय राजकारण्यांच्या दबावामुळे प्रशासनाने घेतला होता. वाहनतळांचे काम करणाऱ्या ठेकेदारांची मुदत संपुष्टात येताच महिला बचत गटांना ते देण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या. मात्र काही कंत्राटदार याविरोधात न्यायालयात गेल्या आणि कामे देण्याची प्रक्रिया थांबवावी लागली. कंत्राटदारांची मुदत संपुष्टात येताच प्रशासनाने त्यांच्याकडून हे काम काढून घेतले आणि वाहनतळांवर पालिकेच्या कामगारांना तैनात केले. वाहनतळांवर येणाऱ्या दुचाकी एका रांगेत लाऊन ठेवणे, वाहनचालकांकडून पैसे वसूल करणे या कामाचा अनुभव नसल्याने कामगार मेताकुटीस आले. वाहनतळांवर पाणी, शौचालयाची व्यवस्था नसल्याने हे काम कामगारांना नकोसे झाले. आता रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्ते विभागाला या कामगारांची आठवण झाली आहे. काही विभाग कार्यालयांमधील निम्म्यापेक्षा अधिक कामगार वाहनतळांवर तैनात आहेत. हे कामगार परत मिळाले तर खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग येईल, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे. मात्र खड्डे बुजविण्यासाठी रात्र जागविण्यापेक्षा वाहनतळ बरे असे कामगार म्हणून लागले आहेत.