पावसाळ्यासोबत येत असलेल्या साथीच्या आजारांविषयी एकीकडे जनजागृती सुरू असतानाच या साथीच्या भीतीचा बागुलबुवा उभा करत रुग्णाला भरमसाट किमतीचे पॅकेज देणारी एक व्यवस्थाही जन्माला आली आहे. गेल्या वर्षी डेंग्यूच्या लक्षणांपेक्षा त्यांच्यावरील उपचारच घातक ठरल्याचे दिसून आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालये व रक्तपेढय़ा यांना प्लेटलेट्सच्या विचारपूर्वक वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डेंग्यूचे ९० टक्के रुग्ण हे केवळ औषधांनी बरे होतात. काही रुग्णांना सावधगिरीचा उपाय म्हणून रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवावे लागते तर काही रुग्णांमध्ये – विशेषत: लहान किंवा वृद्धांना- प्लेटलेट्स कमी झाल्याचे दिसून येते. सर्वसाधारण माणसामध्ये प्लेटलेट्सची संख्या दीड लाख ते चार लाख.. असते. प्लेटलेट्सची संख्या वीस हजारांपेक्षा कमी झाल्यास त्याने जिवाला धोका निर्माण होतो. मात्र प्लेटलेट्सची संख्या एक लाखापेक्षा कमी झाली की सरसकट सर्व रुग्णांना प्लेटलेट्स दिल्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या. गरज नसताना दिल्या गेलेल्या या प्लेटलेट्समुळे गुंतागुंत होऊन रुग्णाची स्थिती अधिक गंभीर झाल्याचे दिसून आले. त्याच वेळी भरमसाट प्लेटलेट्स वापरल्या गेल्याने रक्तपेढय़ांमध्ये प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला व गरजवंत रुग्णांना त्या मिळणे कठीण झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन या वेळी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्लेटलेट्सच्या विचारपूर्वक वापरावर भर दिला आहे. यासंदर्भात खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या.
प्लेटलेट्स देताना केवळ त्यांची पातळी खाली आली, हा एकमेव निकष मानला जाऊ नये. प्लेटलेट्सची संख्या ५०-६० हजारांवर असताना इतर लक्षणांनुरूप, रक्त गोठण्याची क्रिया होते आहे का याचा सारासार विचार करून प्लेटलेट्स देण्याचा निर्णय घ्यायला हवा, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. प्लेटलेट्च्या योग्य नियमनासाठी रक्तपेढय़ांच्या संचालकांचीही बठक बोलावण्यात आली. रक्तपेढय़ांमधून मागणीप्रमाणे सरसकट प्लेटलेट्स दिल्या जाऊ नयेत यासंबंधीच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे डॉ. केसकर म्हणाल्या.
डेंग्यूची लागण कशी होते..
स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा एडीस इजिप्ती हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की डेंग्यूची लागण होते.
लक्षणे
डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणूसंसर्गाप्रमाणेच असतात. मात्र काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की असह्य़ डोकेदुखी होऊ लागते, उलटय़ा होतात, अंग मोडून निघते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात, अंगावर चट्टेही उठतात.
उपचार
विषाणूसंसर्ग असल्याने या आजारातील केवळ लक्षणांवर उपचार केले जातात. या आजारादरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाणी, फळांचे रस यातून दिवसातून दोन ते अडीच लिटर द्रवपदार्थ शरीरात जाणे आवश्यक आहे
बहुतांश वेळा डेंग्यू बरा होत असला तरी डेंग्यू हेमोरेजिक प्रकार मात्र प्राणघातक आहे. आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास रक्तदाब कमी होतो. रुग्णांना आयव्ही फ्लुइड (सलाइन) आणि प्लेटलेट्स द्याव्या लागतात. या प्रकारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाटय़ाने घसरते. अंतर्गत रक्तस्राव होऊन अवयव निकामी होतात. डेंग्यूच्या या प्रकाराचे प्रमाण कमी आहे.