तब्बल २७०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या महानगरपालिकेने वर्ष पूर्ण होण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना निम्मा निधीदेखील वापरलेला नाही. गेली काही वष्रे हेच चित्र दिसत असून एकीकडे रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य या क्षेत्रात अधिकाधिक निधीची आवश्यकता असताना संबंधित विभागांनी तरतूद केलेल्या निधीच्या २० टक्केही निधी अजून वापरलेला नाही.
‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे घेत दरवर्षी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करणारी महानगरपालिका प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीत कमी पडते. नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या हेतूने आखलेला अर्थसंकल्प केवळ कागदावरच राहतो. गेल्या अनेक वर्षांत याच पद्धतीने निधी वापरला जात असून दरवेळी पुढच्या वर्षांत भरपूर तरतूद ठेवली जाते. एकीकडे रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने तरतूदीपकी केवळ ३० टक्केच निधी वापरला आहे. रस्त्यांसाठी काढण्यात येणाऱ्या निविदा लांबल्याने निधी वापरला गेला नसल्याची सारवासारव संबंधित अधिकाऱ्यांनी केली.
आरोग्यासाठी ठेवलेल्या निधीतून यावर्षी तीन उपनगरीय रुग्णालये कार्यरत झाली असली तरी त्यासाठीचा निधी गेल्या वर्षीच्या तरतुदीतून वापरला गेला आहे. प्रत्यक्षात ३० नोव्हेंबपर्यंत उपलब्ध निधीच्या अवघी १० टक्के रक्कम वापरली गेली आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण विभागातही वेगळे चित्र नाही. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत दोन्ही विभागात १० टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पालिका कागदमुक्त करण्याची घोषणा करणारया पालिकेने माहिती तंत्रज्ञानासाठी राखून ठेवलेल्या १२० कोटी रुपयांपकी केवळ चार कोटीच वापरले आहेत. ‘आखणी केल्याप्रमाणे कामे सुरू आहेत, अजून चार महिने शिल्लक आहेत व बांधकाम प्रकल्प या वेळेत सुरू होतात, त्यामुळे अधिकाधिक निधी वापरला जाईल,’ असे पालिका अधिकारी सांगत आहेत.
महानगरपालिका काही हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडते, मात्र कोणत्याही योजनांची नीट अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी निधी पडून राहतो. मग हाच निधी पुढच्या वर्षी जमा होतो आणि अर्थसंकल्प अधिक फुगीर होतो. निवडणुकांच्या वर्षांत लोकप्रिय घोषणांसाठी मग तो वापरला जातो, असा आरोप काँग्रेसचे गटनेते बाळा आंबेरकर यांनी केला.
पालिकेतील विभागांनी वापरलेला निधी (कोटी रुपयांमध्ये)
विभाग १३-१४ साठी ३० नोव्हे. १३ पर्यंत १२-१३ साठी ३० नोव्हे. १२ पर्यंत
केलेली तरतूद प्रत्यक्षात वापरलेला निधी केलेली तरतूद प्रत्यक्षात वापरलेला निधी
माहिती तंत्रज्ञान विभाग १२० ४ १२१ ९
घनकचरा व्यवस्थापन २३३ २१ २६० २३
मलनिसारण विभाग १३३५ ३२३ ११०० २८९
अग्निशमन दल १२६ ९ १६० ४
उद्यान विभाग १६३ ३० २२८ १४.५
रस्ते आणि वाहतूक विभाग १४५१ ४२२ १५४५ २६३
आरोग्य विभाग ६५१ ६७ ६५९ १४०
