शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थीकलशाचे आज शहरात ठिकठिकाणी दर्शन घेण्यात आले. फुलांनी सजवलेल्या रथातून अस्थीकलश नेत असताना चौकाचौकात त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
आमदार अनिल राठोड, महापौर शीला शिंदे, सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर दिपक सूळ, सभापती सतीश धाडगे, विक्रम राठोड, तसेच नगरसेवक, पदाधिकारी यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले. बाळासाहेबांच्या आठवणींनी अनेकांना गहिवरून येत होते.
शहराच्या विविध भागांतून अस्थीकलश नेताना नागरिक, तसेच शिवसैनिकांची दर्शनासाठी गर्दी होत होती. साहेब परत या, बाळासाहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. जुने बसस्थानक, माणिक चौक, कापडबाजार, चितळे रस्ता अशा बहुतेक ठिकाणी नागरिक कलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत होते. सायंकाळी उशिरा नक्षत्र लॉन येथे कलश आणण्यात आला. तिथेही दर्शनासाठी गर्दी होती. अस्थीकलश रथ तेथून नंतर भिंगार येथे नेण्यात आला.
चिचोंडी पाटील (नगर तालुका) येथेही अस्थीकलश आल्यानंतर जिल्हाप्रमुख गाडे, पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले, पोपट निमसे, जि. प. सदस्य दत्तात्रय सदाफुले, तसेच ग्रामस्थांनी दर्शन घेतले. नगर तालुक्यातही अनेक ठिकाणी शिवसैनिकांसह ग्रामस्थांचीही दर्शनासाठी गर्दी झाली होती.
जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने बुऱ्हाणनगर येथील फोर्स कंपनी, तसेच भाळवणी येथील सुपरफाईन कंपनीत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्ष बाबूशेट टायरवाले, तसेच व्यवस्थापक गिरगस, तुकाराम लांडे, सचिव वसंतसिंग, शिवाजी रोहकले, संजय रोहकले, सुरेश रोहकले, नवनाथ बांगर, संतोष कदम व कामगार यावेळी उपस्थित होते.
श्रीरामपूरला शिवसैनिकांची रिघ
श्रीरामपूर- ठाकरे यांचा अस्थीकलश आज शहरात आणण्यात आल्यानंतर दर्शनसाठी लोकांची व शिवसैनिकांची रिघ लागली होती. महाराष्ट्राची अस्मिता जागविणाऱ्या नेत्याच्या स्मृती जागवून त्यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र देवकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते कोपरगावहून अस्थीकलश घेऊन आले.  
कर्जत, श्रीगोंदे, जामखेडला दर्शनासाठी गर्दी
कर्जत- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे काल (बुधवार) जामखेड, श्रीगोंदे व कर्जत तालुक्यात आगमन होताच ठिकठिकाणी थांबून लोकांनी दर्शन घेतले. उपजिल्हाप्रमुख राजेंद दळवी, अनिल कराळे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या अस्थींचे नगर येथून जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर येथे आगमन झाले. सकाळी दहा वाजता जामखेड येथे आगमन होताच तालुकाप्रमुख वैजिनाथ पाटील व इतर शिवसैनिकांनी दर्शनासाठी रथ फिरवला. दुपारी बारा वाजता कर्जत तालुक्यातील माहीजळगांव येथे अस्थीरथ आमदार राम शिंदे, शशिकांत गाडे, राजेंद दळवी, अनिल कराळे, संदेश कार्ले, बळीराम यादव, दीपक शहाणे, महावीर बोरा आदींच्या
उपस्थितीत नागरीकांनी दर्शन घेतले. श्रीगोंदे शहरातील शेख महंम्मद महाराज मंदिरात
कलश ठेवण्यात आला होता. यावेळी तालुकाप्रमुख बाळासाहेब काटे, नंदू ताडे, भाऊसाहेब गोरे, संतोष इथापे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित
होते.
सामान्य माणूस ठाकरेंचा केंद्रबिंदू- वाकचौरे
कोपरगाव – ठाकरे यांनी सतत सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवल्यानेच जगाने आपल्या हृदयात त्यांना जागा देवून हिंदूसम्राट म्हणून गौरविले असल्याची भावपूर्ण श्रद्धांजली खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी येथील सभेत बोलताना वाहिली. ठाकरेंचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी आणण्यात आला. या वेळी असंख्य नागरिकांनी या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या वेळी खासदार वाकचौरे बोलत
होते.
प्रारंभी आमदार अशोक काळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सतत शिवसैनिक, शाखाप्रमुख, तालुका व जिल्हाप्रमुखांना मानाचे स्थान दिले, असे प्रतिपादन केले. येथील बसस्थानका समोरील स्मारकाजवळ माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, रावसाहेब सोनवणे, शहरप्रमुख काका शेखो, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जितेंद्र रणशूर आदींनी  सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली.