बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्यांना बेस्टच्या वाहक-चालकांचा अतोनात राग आला. अशा वेळी बोरिवलीतील एका नगरसेवकाने एकाच वेळी नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे संपकरी वाहक-चालकांनाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवताना जो काही खर्च झाला तो कोणी केला, हा प्रश्न मात्र त्याला कुणी विचारणार नाही. कारण दोघांचीही सोय झालेली होती!
गेले दोन दिवस एकही बस रस्त्यावर न उतरल्याने या नगरसेवकाने आपल्या प्रभागातील रहिवाशांच्या सोयीकरिता खासगी बसगाडय़ा रस्त्यावर उतरविल्या. एरवी बसकरिता १०-१२ रुपयांचे तिकीट तरी फाडावे लागते. पण, या नगरसेवकाच्या कृपेमुळे बोरिवलीतील, विशेषत: गोराई, चारकोपमधील रहिवाशांना बोरिवली स्टेशनपर्यंत फुकटात वाहतूक सेवा उपलब्ध झाली. नगरसेवकांची ही ‘सेवा’ कानी पडल्यावर येथील गोराई आगारातील संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनीही मग आपल्या क्षुधाशांतीसाठी या नगसेवक महाशयांनाच पकडले.
आगारात संपासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या फर्माईशीवरून संपाच्या पहिल्या दिवशी नगरसेवक महाशयांनी दुपारच्या सुमारास त्यांना बिर्याणी पुरविली. बिर्याणी झोडपल्यानंतर इथल्या बोडक्या आगारात कर्मचाऱ्यांचे डोके उन्हामुळे (आणि झोपेनेही) जड होऊ लागले. एरवी गाडीत असताना किमान डोक्यावर छप्पर तरी असते. पण, इथे त्याचीही सोय नाही. त्यामुळे, डोके तापायला लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या बसण्याची सोय समोरच्या गारेगार मॉलमध्ये करण्यात आली.
आपल्या प्रभागातील रहिवाशांची फरफट होऊ नये म्हणून बससेवा उपलब्ध करून देणे इतपत समजण्यासारखे होते. पण बेस्ट कर्मचाऱ्यांना चमचमीत जेवण पुरवण्याचे काय कारण, असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.