सरकारी इमारत बळकाविण्याचा डाव असल्याचा संस्थेचा आरोप
समाजकंटकांच्या सततच्या त्रासामुळे बोरिवलीतील अस्थिव्यंग चिकित्सा पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अपंग विद्यार्थ्यांना घरून घेऊन येणाऱ्या व नेऊन पोहोचविणारे वाहन काही दिवसांपूर्वीच ड्रायव्हरसकट पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता या समाजकंटकांनी अन्य मार्गाने त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या साऱ्या दहशतीच्या प्रकारांमागे हे अपंग पुनर्वसन केंद्र हलवून संपूर्ण इमारतच बळकाविण्याचे षडयंत्र असावे, अशी शंका संस्थेने व्यक्त केली आहे.
बोरिवली पूर्वेकडील अशोकवन येथील हनुमान टेकडीजवळ असलेल्या ‘कल्याणी केंद्र’ या इमारतीमध्ये ‘मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुर्नवसन केंद्र’ ही संस्था आहे. पश्चिम उपनगरातील अपंग मुलांना स्वत:च्या वाहनातून रोज संस्थेत आणून त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण ही संस्था देते. या मुलांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचे कामही ही संस्था करते. सुमारे २५ा वर्षे संस्थेचे काम सुरू आहे. १९८९ साली समाजकल्याण विभागातर्फे या संस्थेसह अन्य १३ संस्थांना या इमारतीत जागा देण्यात आली होती. आता अन्य संस्था येथून निघून गेल्या आहेत. परंतु अपंग पुनर्वसन केंद्र जिद्दीने येथे तग धरून आहे. या इमारतीत असलेल्या ‘अण्णाभाऊ साठे महामंडळा’च्या कर्मचाऱ्यांकडून अपंग पुनर्वसन केंद्राला वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप पुनर्वसन केंद्राचे समन्वयक दीपक खानविलकर यांनी केला आहे. ही जागा सरकारी असून आता विकसित झाली आहे. त्यामुळे ती बळकाविण्यासाठी हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचा आरोप खानविलकर यांनी केला.
काही दिवसांपूर्वी इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या संस्थेच्या वाहनाची तोडफोड करून ते जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या वेळी वाहनाचा चालक आतच झोपला होता. तसेच वाहनात सीएनजी गॅस पूर्ण भरलेला होता. जाळपोळीचा समाजकंटकांचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर ड्रायव्हरसकट वाहन तर जळाले असतेच; परंतु सीएनजीचा स्फोट झाला होऊन आसपासच्या अनेक इमारतींनाही फटका बसला असता. याबाबत दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही पुन्हा सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात आल्याची तक्रार संस्थेने पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिरजादे यांनी सांगितले की, वाहन मोडतोड प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्याचा तपास करत आहोत. अस्थिव्यंग चिकित्सा केंद्र आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या परस्परांविरोधात तक्रारी आल्या आहेत. आम्ही त्याचा तपास करून आवश्यक ती कारवाई करू.
अपंग मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे काम करणारी ही संस्था उदात्त भावनेतून गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे शासनाने याबाबत सहानभूतीपूर्वक विचार करून संस्था वाचवावी, असे आवाहन संचालिका सुधा वाघ यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळाने आरोप फेटाळले
अण्णाभाऊ महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. १९९६ साली केवळ दोन वर्षांसाठी अंपगांच्या संस्थेला या सदनिका देण्यात आल्या होत्या. संस्थेच्या संचालिका सुधा वाघ यांनी पहिला माळा भाडय़ाने दिला असून अंपगांना स्टॉल देऊन भाडे वसूल करत आहे. ती अपंगाची संस्था आहे तर शासकीय जागा भाडय़ाने देऊन अपंगांकडून भाडे कसे घेतात असा सवाल त्यांनी केला. वाघ आमच्या पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करीत असूनही आम्ही साधी ‘अॅट्रॉसिटी’ची तक्रारही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. बस जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अवघ्या एका तासात आम्ही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. आरोपी पकडण्यासाठी आम्ही सहकार्य करीत आहोत, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2013 रोजी प्रकाशित
बोरिवलीच्या अपंग पुनर्वसन केंद्रातील विद्यार्थी धास्तावले!
समाजकंटकांच्या सततच्या त्रासामुळे बोरिवलीतील अस्थिव्यंग चिकित्सा पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अपंग विद्यार्थ्यांना घरून घेऊन येणाऱ्या व नेऊन पोहोचविणारे वाहन काही दिवसांपूर्वीच ड्रायव्हरसकट पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
First published on: 31-01-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Borivli handicap rehabuiltation center students in fear