धार्मिक कार्यासाठी चांदवड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदलगाव येथील म्हसोबा मंदिरात आलेल्या मनमाड व धुळे येथील दोन कुटुंबीयांमध्ये वाहन उभे करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर तूफान हाणामारीत झाले. या घटनेत मनमाडच्या सांगळे कुटुंबातील १२ तर धुळ्याच्या थोरात कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.
मनमाड ते मालेगाव मार्गावर मनमाडपासून सात किलोमीटरवर कुंदलगाव आहे. या ठिकाणचे म्हसोबा देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणचे भाविक येथे येत असतात. मंगळवारी दुपारी मनमाड येथील सांगळे कुटुंबीय येथे दर्शनासाठी गेले. कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमासाठी स्वयंपाक करण्याची तयारी सुरू असताना धुळ्याहून थोरात कुटुंबीयांचे गाडय़ांमधून तेथे आगमन झाले. गाडी उभी करण्याच्या आणि बाजूला घेण्याच्या कारणावरून या दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. दोन्ही कुटुंबांतील सदस्य आपलीच बाजू खरी असल्याचे सांगत नमते घेण्याचे टाळू लागले. कोणीही माघार घेण्याच्या स्थितीत नसल्याने वाद वाढून त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. देवस्थानासमोरच चाकू, सुरे, लाकडी फळ्या, गज असे हाती येईल त्या साहित्याचा उपयोग दोन्ही कुटुंबीयांकडून हाणामारीसाठी झाला. देवस्थानासारख्या पवित्र ठिकाणी नम्र होण्याऐवजी स्वभावाचा ताठा कायम ठेवत थेट हाणामारी सुरू करण्याच्या या प्रकाराने उपस्थित अवाक झाले. हाणामारीत सांगळे कुटुंबातील १२ जण जखमी झाले. त्यांच्यावर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यातील चार जण गंभीर असून त्यांना मालेगाव व नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
म्हसोबा देवस्थानासमोर हाणामारी झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत धुळ्याचे थोरात कुटुंबीय आपल्या वाहनांमधून मालेगावकडे रवाना झाले होते. त्यातील दत्तू थोरात यांच्यासह चार जण जखमी झाले असून मालेगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ कारणावरून थेट हाणामारीपर्यंत येण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्याने पोलिसांवरील ताण नाहक वाढू लागला आहे. भाविकांनी किमान धार्मिक ठिकाणी तरी शांतता व संयम बाळगणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.