जगातील जवळजवळ तीस टक्के लोकसंख्या एखाद्या तरी अ‍ॅलर्जीने त्रस्त आहे. यातही श्वसनाशी संबंधित अ‍ॅलर्जीचे प्रमाण मोठे आहे आणि जगभरात ते सतत वाढत आहे. इतकेच नव्हे तर अ‍ॅलर्जीची ही लक्षणे म्हणजे जागतिक तापमानवाढीचाच एक परिणाम आहेत.
‘इंडियन एअरोबायोलॉजिकल सोसायटी’चे सचिव डॉ. ए. बी. सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भारतातील १८ वैद्यकीय संशोधन केंद्रे हवेमार्फत होऊ शकणारी अ‍ॅलर्जी आणि माणसाच्या आरोग्यावर तिचा होणारा परिणाम यावर संशोधन प्रकल्प राबवीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
‘इंडियन एअरोबायोलॉजिकल सोसायटी’, ‘माईर्स आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’ आणि ‘माईर्स महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी’ यांच्यातर्फे नुकतेच ‘एअरोबायोलॉजी’ विषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जगभरात अ‍ॅलर्जीशी संबंधित आजारांचा काय कल दिसतो याची चर्चा केली गेली. ‘ युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर’च्या वनस्पतिशास्त्र विभागाचे डॉ. एच. मुन्शी म्हणाले, ‘‘वर्ल्ड अ‍ॅलर्जी ऑर्गनायझेशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘पोलन अ‍ॅलर्जी’ अर्थात परागकणांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीचे प्रमाण विकसित तसेच विकसनशील देशांतही वाढत असल्याचे म्हटले आहे. जगातील लाखो लोक पोलन अ‍ॅलर्जीमुळे खाज, शिंका येणे, नाक वाहणे, डोळ्यांत पाणी येणे अशा प्रकारच्या लक्षणांमुळे त्रस्त आहेत. साधारणपणे वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात होणाऱ्या परागकणांच्या प्रादुर्भावामुळे अशा प्रकारची अ‍ॅलर्जी होऊ शकते.’ शांतिनिकेतन येथील ‘विश्व भारती विद्यापीठा’च्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. काशीनाथ भट्टाचार्य यांनी सांगितले, की ‘परागकणांच्या आवरणांमध्ये विविध प्रकारची प्रथिने आणि ग्लायकोप्रथिने असतात. ही प्रथिने अ‍ॅलर्जीस कारणीभूत होऊ शकतात. हे परागकण फुलांच्या परागकोशात तयार होतात. हवेत आढळणारे ३० प्रकारचे परागकण ‘अ‍ॅलर्जिक’ म्हणून ओळखले जातात.’