बांधकाम व्यावसायिकांनी अंबरनाथ शहराच्या चतु:सीमेवरून वाहणारे पूर्वापार नाले बुजविण्याचा सपाटा लावल्याने अतिवृष्टीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठू लागले आहे. नाल्यांवरील ही वाढती अतिक्रमणे वेळीच रोखली नाहीत, तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची चुणूक गेल्या आठवडय़ात पडलेल्या विक्रमी पावसाने दाखवून दिली आहे. अंबरनाथमध्ये गेल्या पंधरवडय़ात विक्रमी ७९० मि.मी. पाऊस पडला. या पावसाने शहरात यापूर्वी कधीही न साचलेल्या ठिकाणीही पाणी तुंबून राहिले. बांधकाम व्यावसायिकांनी जास्तीत जास्त भूखंड मिळविण्याच्या हव्यासापोटी नाल्यांवर अतिक्रमण केले असून त्यामुळेच ही परिस्थिती उद्भविल्याचे दिसून येत आहे.
अंबरनाथ-बदलापूर या दोन शहरांमध्ये चिखलोली गावाजवळील नाला गेल्या वर्षी एका बांधकाम व्यावसायिकाने बुजविला. त्यामुळे यंदा पावसाचे पाणी बारवी धरण रस्त्यावरून वाहू लागले होते. शेजारील शेतांमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. अशाच प्रकारे मोरीवली, कमलाकर नगर, भास्कर नगर, नवरे नगर, नवरे पार्क आदी परिसरातील नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. आपल्या स्वार्थासाठी बांधकाम व्यावसायिक नाल्याचे पात्र अरुंद करतात, त्याचा प्रवाह बदलतात किंवा अगदी बिनदिक्कतपणे नाले बुजवितात. अशा प्रकारे भर नाल्यात उभ्या राहिलेल्या इमारतींची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ शहरात कोणत्याही दिशेने प्रवेश करताना पूर्वी एक तरी नाला ओलांडावा लागत होता. नागरीकरणाच्या रेटय़ात या नाल्यांचे मोठय़ा गटारांमध्ये रूपांतर झाले आहे. अनेक नाले तर होत्याचे नव्हते झाले आहेत. चारही दिशांच्या औद्योगिक वसाहतींमधून हे नाले वाहतात. त्यामुळे कारवाई करण्याबाबत एमआयडीसी आणि पालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवितात. अंबरनाथ शहरातील नाल्यांवरील या वाढत्या अतिक्रमणांची गंभीर दखल तहसील कार्यालयाने घेतली आहे. यासंदर्भात पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.