उद्योगनिर्मिती किंवा विकासाकरिता शासनाकडून न्याय्य प्रतिसाद मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार भांडून, न्याय पदरात पाडून घेणे महत्त्वाचे, असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले.
भंडारा जिल्हा लघुउद्योजक संस्थेच्या स्नेहसंमेलनात जिल्ह्य़ातील उद्योजकांसमोर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सच्चिन्द्रप्रताप सिंह होते. अन्य उपस्थितात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नंदकिशोर खंते व उपविभागीय अधिकारी (देवरी), राहुल द्विवेदी होते. संस्थेचे अध्यक्ष रामविलास सारडा यांनी वेळोवेळी संघटनेच्या बळावर सोडविलेल्या उद्योजकांच्या समस्यांबद्दल माहिती दिली. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, जिल्ह्य़ात पितळ उद्योगासोबतच अन्य कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांना भरपूर वाव आहे. उद्योजकांनी पारंपरिक उद्योगांसोबतच, नवीन उद्योगांकरिता सामोरे यावे. ज्येष्ठ उद्योजकांनी तरुणांना वाव द्यावा. राज्याच्या उद्योगविषयक धोरणातही बदल करण्याची गरज आहे, त्याकरिता आपण प्रयत्न करू. जिल्ह्यात होणाऱ्या उद्योग उभारणीत व संघर्षांत ते संस्थेच्या पाठीशी राहतील.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी सच्चिन्द्रप्रताप सिंह म्हणाले, उद्योजकांनी भीड न ठेवता समस्या त्यांच्या निदर्शनात आणाव्यात. देशाच्या मध्यभागी, राष्ट्रीय महामार्गावर, तसेच मिहानच्या शेजारी असणे, जिल्ह्य़ाचे उद्योगजगतातील उज्जवल भविष्य दर्शवित आहे. जुने उद्योग उर्जितावस्थेत आणणे व नवीन उद्योगांची उभारणी करणे हे आव्हान नवीन पिढीतील उद्योजकांनी स्वीकारावे. आभार इंद्रजित आनंद यांनी मानले. संचालन प्रकाश राहांगडाले यांनी केले.