शाळा न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटी सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी निलंबित मुख्याध्यापक रेव्ह. फादर पीटर अमोलिक यांना पुन्हा सामावून घेण्यात आले. फादर अमोलिक यांनी अलीकडेच या पदाचा पदभार घेतला.
शाळा न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र खासगी कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ नियम ३७ (२) (फ)मधील नियमात निर्धारित कार्यपद्धतीनुसार व निर्धारित वेळेत रेव्ह. फादर अमोलिक यांच्याविरुद्ध चौकशी करणे आवश्यक होते. मात्र, या वेळेत ही चौकशी पूर्ण न केल्यामुळे नियम ३७ (२) (फ) नुसार फादर अमोलिक यांना मुख्याध्यापकपदावर त्वरित हजर करून घ्यावे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल औरंगाबाद जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे या कार्यालयाने संस्थेस दिलेल्या पत्रात स्पष्ट केले होते. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध सध्या चालू असलेली चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून योग्य ती कार्यवाही करावी, असेही पत्रात नमूद केले आहे.