एखाद्याला मूळ नावात बदल करणे पूर्वी सहज शक्य होते. बॉलीवूड व साहित्य क्षेत्रात तर नाव बदलण्याची, टोपण नावाची फॅशन आहे, मात्र आता मूळ नावात पूर्णपणे बदल करता येणार नाही, असा अध्यादेश जन्म व मृत्यू खात्याचे उपसंचालक व उपमुख्य निबंधकांनी काढला आहे, तसेच समाजाच्या व जातीच्या नावाचा आडनाव म्हणून वापर करता येणार नाही. या नव्या अध्यादेशामुळे कोणालाही स्वत:चे मूळ नाव बदलता येणार नाही.
मूळ जन्म नावात, आडनावात बदल करण्याची फॅशन हळूहळू रुळत आहे. एखाद्याला जन्म नाव व टोपण नाव, अशी दोन नावे असतात. त्यानंतर मूळ नावाऐवजी टोपण नावच त्याच्या जन्मनोंदीच्या पत्रिकेवर येते. यामुळे बराच गोंधळ निर्माण होतो. काही जण तर जन्म नाव व टोपण नाव, अशा दोन्हीची नोंद घेतात, तर एखाद्याचे जन्म नाव काही प्रमाणपत्रावर राहाते, तर काहींवर टोपण नावही असते. त्यामुळे बराच गोंधळ उडतो. शासकीय नोकरीत असा गोंधळ राहिला तर त्यांना नोकरीपासूनही वंचित राहावे लागते. काही जण तर फॅशन म्हणून स्वत:चे मूळ नाव व आडनाव बदलून घेतात, तर काही जण मूळ नाव, वडिलांचे नाव व आईचे नाव, असे स्वतंत्र नाव तयार करतात. त्यासाठी तशी कागदपत्रेही तयार करून घेतली जात होती. बॉलीवूड व साहित्य क्षेत्रात तर नाव बदलण्याची व टोपण नावाची फॅशन आहे. हा सर्व गोंधळ लक्षात घेऊन जन्म व मृत्यू खात्याचे उपसंचालक व उपमुख्य निबंधकांनी एक अध्यादेश काढून भविष्यात नावात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.
एखाद्याचे मूळ नाव रमेश असेल व नंतर त्याला महेश करायचे असेल तर त्याला तसे करता येणार नाही. नवीन जन्मलेल्या मुलाच्या नावाबाबत हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. मूलाचे नाव नोंदविताना कोणतीही औपचारिक चूक झालेली असेल किंवा काही लेखन प्रमादाने चूक झालेली असेल तर त्यात कलम १५ अनुसरून बदल करता येतो, असेही या अध्यादेशात म्हटले आहे.
आईवडिलांच्या नावात चूक झालेली असेल तर त्याबाबतचे सबळ पुरावे सादर केल्यावर निबंधक त्याची खात्री पटल्यावर त्याबाबत नोंदवहीतील शेरा रकान्यात याबाबतची नोंद घेऊन त्यानुसार प्रमाणपत्र अदा करू शकतो. जर टोपण नावाची नोंद झालेली असेल अथवा   माहेरच्या   नावाची नोंद झालेली असेल तर त्याबाबतचे सबळ   पुरावे   सादर   करून चुकीची दुरुस्ती  करू शकतात, असेही यात नमूद आहे.  विशेष म्हणजे, प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर तत्काळ याबाबत न कळविण्याची कारणे शोधून काढल्यानंतरच व निबंधकांची खात्री पटल्यावर हा बदल करता येणार आहे. पूर्वी समाजाचे व जातीचे नाव आडनाव म्हणून लावण्यात येत होते, परंतु नव्या अध्यादेशामुळे समाज व जातीचे नाव लावता येणार नाही किंवा व्यवसायाचे नाव आडनाव म्हणून लावता येत नाही, तसेच जात, गाव किंवा इतर कोणत्याही बाबींचा उल्लेख आडनावात करता येत नाही. उदा. बागवान, शिंपी, कोळी, वाणी, तेली व पाटील या जाती असून असा कुठलाही वापर करता येणार नाही.
आईवडिलांचे नाव नोंदवितांना किंवा आडनाव लिहितांना चुका होण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुका केवळ शासकीय पुरावे प्राप्त झाल्यावर व निबंधकांनी त्याच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यावर दुरुस्ती करता येईल, असेही म्हटले आहे.
 जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू तसेच सर्व ग्रामसेवकांनी या अध्यादेशाची दखल घ्यावी व मूळ नावात बदल करू नये, असे पत्र   उपसंचालक   आरोग्य  सेवा व उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यू विभाग यांनी कळविले आहे.