भायखळ्यातील मैदानासाठी राजकीय पक्षाकडून करण्यात आलेल्या जनमत चाचणीत ६८८३ मते अनुकूल, दोन प्रतिकूल
भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारीकरणात शेजारील मैदानाचा बळी जाऊ नये अशी स्थानिकांची इच्छा आहे. तसेच स्थानिकांच्या या इच्छेला राजकीय पाठबळही मिळाले असून, मनसेकडून या परिसरात जनमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ६८८३ रहिवाशांनी मैदान वाचवण्याच्या बाजूने मतदान केले असून, केवळ दोन नकारात्मक मते आली. या सर्व मतांचा गठ्ठा मनसेच्या नगरसेवकांकडून बुधवारी पालिका आयुक्तांना दाखवण्यात आला असून, मैदान वाचवण्याची मागणी केली गेली.
दक्षिण मुंबईत मोकळ्या जागांची आत्यंतिक कमतरता आहे. राणीबागेच्या जवळ मुलांचे एकमेव खेळण्याचे ठिकाण असलेले मैदानही बजाज ट्रस्टकडून होत असलेल्या वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारीकरणात देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत संख्याबळाच्या आधारावर संमत करण्यात आला. याविरोधात मनसेच्या स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांनी आवाज उठवला. या मैदानासाठी स्थानिकांनीही मनसेला पाठिंबा दिला. शनिवारी-रविवारी या विभागात मनसेकडून जनमत चाचणी घेण्यात आली. या अर्जावर उजवीकडील वरच्या कोपऱ्यात मतदाराचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक लिहिण्यात आला. खेळाचे मैदान हवे की पार्किंगसाठी जागा द्यावी या दोन पर्यायांपैकी एक निवडून तो मतपेटीत टाकायचा होता. या चाचणीत सुमारे सात हजार रहिवाशांनी भाग घेतला. त्यातील ६८८३ मते मैदान वाचवण्याच्या बाजूने पडली.
अन्यथा आयुक्तांना संदेश पाठवण्यास सांगणार
ही सर्व मते आम्ही आयुक्त सीताराम कुंटे यांना सादर केली. स्थानिकांचा आग्रह व मुंबईतील मोकळ्या जागांची कमतरता लक्षात घेऊन ही जागा केवळ मैदान म्हणूनच ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घ्यायला हवा. अन्यथा आम्ही आयुक्तांचा मोबाइल क्रमांक स्थानिकांना देणार असून, त्यांनाच आयुक्तांना संदेशाद्वारे मैदान वाचवण्याचे आवाहन करण्यास सांगणार असल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असून, न्यायालयात जाण्याचीही तयारी आहे, असेही ते पुढे म्हणाले.